चिकलठाणा एमआयडीसीतील सिपेट कोविड सेंटरची तोडफोड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2021 04:02 AM2021-09-22T04:02:57+5:302021-09-22T04:02:57+5:30
औरंगाबाद: चिकलठाणा औद्योगिक वसाहतीमधील सिपेट कोविड सेंटरची अज्ञातांनी तोडफोड केल्याची घटना मंगळवारी समोर आली. दोन महिन्यापासून बंद असलेले केंद्रात ...
औरंगाबाद: चिकलठाणा औद्योगिक वसाहतीमधील सिपेट कोविड सेंटरची अज्ञातांनी तोडफोड केल्याची घटना मंगळवारी समोर आली. दोन महिन्यापासून बंद असलेले केंद्रात चोरी झाली की, खोडसाळपणातून समाजकंटकाने हे कृत्य केले, याचा तपास पोलीस करत आहेत. एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
महापालिकेने गतवर्षी वाढत्या कोविड संसर्गामुळे चिकलठाणा औद्योगिक वसाहतीमधील सिपेट सेंटर ताब्यात घेऊन त्याचे रुपांतर कोविड सेंटरमध्ये केले होते. या कोविड सेंटरमध्ये हजारो रुग्णांनी उपचार घेतले. कोविड रुग्णांची संख्या कमी झाली आणि मनपाने सिपेट कोविड सेंटरला कुलूप लावले. अज्ञातांनी कुलूप तोडले. तेथील सीसी टीव्ही आणि डीव्हीआरची तोडफोड केली. खोल्या, रेकॉर्ड रूमच्या दरवाजाचे कुलूप तोडून सामानाची नासधूस केली. वॉशबेसिनच्या भांड्याची तोडफोड करून तोट्या काढून नेल्या. लोखंडी कपाट उचकटून त्यातील साहित्य अस्ताव्यस्त फेकले. कोविड सेंटरमधील इलेक्ट्रीक वायरिंग, संगणकासह टेबल खुर्च्याचीही तोडफोड केली. काही दिवसांपूर्वी हा प्रकार समोर आला; मात्र पोलिसांत तक्रार केली नव्हती. मंगळवारी सायंकाळी या घटनेची माहिती एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्याच्या प्रमुखांना कळविण्यात आली. पाेलीस निरीक्षक विठ्ठल पोटे आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. या केंद्राचे व्यवस्थापक रजेवर असल्याचे सूत्रांनी सांगितले.
चौकट
सुरक्षारक्षकही नाही
सिपेट कोविड सेंटरला रुग्णालयाचे स्वरूप देण्यात आले होते. एखाद्या रुग्णालयात आवश्यक असलेल्या सर्व सोयी-सुविधा तेथे उपलब्ध करण्यात आल्या होत्या. तेव्हा तेथे सुरक्षारक्षक नेमले होते. रुग्णसंख्या कमी होताच या मनपाने सेंटरला दोन महिन्यापूर्वी कुलूप लावले आणि सुरक्षारक्षकही काढून घेतले. या बेवारस केंद्रात घुसून अज्ञातांनी तोडफोड करून काही साहित्याची चोरी केली.