सिडको-हडकोत पुन्हा पाडापाडी; आता खुल्या जागा, मुख्य रस्त्यांकडे लक्ष
By मुजीब देवणीकर | Published: November 23, 2023 12:40 PM2023-11-23T12:40:30+5:302023-11-23T12:40:51+5:30
महापालिकेने या भागाकडे फारसे लक्ष दिले नाही. त्यामुळे नागरिकांनी सोयीनुसार अतिक्रमणे केली.
छत्रपती संभाजीनगर : सिडको-हडको भागातील अतिक्रमणांसंदर्भात खंडपीठात सुनावणी सुरू आहे. दर महिन्याला महापालिकेकडून अहवाल सादर करण्यात येतो. पहिल्या टप्प्यात सिडको एन-१ ते एन-१३ पर्यंत दोन स्वतंत्र पथकांद्वारे मनपाने मोठ्या प्रमाणात पाडापाडी केली. आता दुसऱ्या टप्प्यात पुन्हा कारवाई सुरू होणार असून, यावेळेस खुल्या जागा, मुख्य रस्त्यांकडे अधिक लक्ष दिले जाणार आहे.
सिडको-हडकोचे २००६ मध्ये महापालिकेकडे हस्तांतरण करण्यात आले. महापालिकेने या भागाकडे फारसे लक्ष दिले नाही. त्यामुळे नागरिकांनी सोयीनुसार अतिक्रमणे केली. सिडको-हडकोला बकाल स्वरूप प्राप्त होत होते. यासंदर्भात एक जनहित याचिका खंडपीठात दाखल करण्यात आली. खंडपीठाने कारवाईसंदर्भात महापालिकेला आदेश दिले होते. सहा महिन्यांपूर्वी विशेष मोहीम हाती घेण्यात आली. हजारो अतिक्रमणांवर कारवाई करण्यात आली, मात्र न्यायालयाचे त्यावर समाधान झाले नाही. त्यानंतर पुन्हा सूक्ष्म सर्वेक्षण करून अहवाल सादर करण्यात आला. दिवाळीमुळे कारवाया थांबल्या होत्या. बुधवारी अतिक्रमण हटाव विभागाचे प्रमुख आयुक्त सौरभ जोशी यांनी पदनिर्देशित अधिकाऱ्यांची बैठक घेऊन सिडको भागात पुन्हा कारवाया सुरू करण्याचे आदेश दिले. रस्त्यावर वाहतुकीला अडथळा ठरणारे व खुल्या जागेवरील अतिक्रमणे हटविली जाणार आहेत. आठवडाभरात ही मोहीम सुरू होईल, असे त्यांनी सांगितले.
पथक एक दिवसही थांबणार नाही
मागील तीन दिवसात पथकाने शहरात एकाही ठिकाणी कारवाई केली नाही. पथक दिवसभर उभे राहता कामा नये, जुन्या शहरात किंवा सिडको-हडको भागात एक चक्कर मारलीच पाहिजे. मुख्य रस्त्यांवरील अतिक्रमणे तरी काढली पाहिजेत. यापुढे पथक एकही दिवस थांबून राहणार नाही, याची काळजी घ्यावी, अशी सूचना जोशी यांनी दिली.