शिवसेनेने जिल्हा परिषदेतील काँग्रेससोबतची युती तोडावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2019 12:25 AM2019-02-21T00:25:45+5:302019-02-21T00:26:09+5:30
शिवसेनेने जिल्हा परिषदेत असलेली काँग्रेससोबतची युती तोडावी. अध्यक्षपदाबाबत जो काही निर्णय घ्यायचा आहे. तो नंतर घेता येईल; परंतु सध्या काँग्रेसला सत्तेतून बाहेर करावे. यासाठी प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांची तातडीने भेट घेण्यात येईल, असे मत भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. भागवत कराड यांनी केले.
औरंगाबाद : शिवसेनेने जिल्हा परिषदेत असलेली काँग्रेससोबतची युती तोडावी. अध्यक्षपदाबाबत जो काही निर्णय घ्यायचा आहे. तो नंतर घेता येईल; परंतु सध्या काँग्रेसला सत्तेतून बाहेर करावे. यासाठी प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांची तातडीने भेट घेण्यात येईल, असे मत भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. भागवत कराड यांनी केले.
लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना-भाजपच्या युतीची घोषणा झाल्यानंतर राज्यात ज्या ठिकाणी जि.प.,पंचायत समित्या किंवा नगरपालिकांमध्ये सत्ता स्थापनेसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने सेना किंवा भाजपसोबत केलेली अभद्र आघाडी तात्काळ तोडण्याचे आदेश पक्षश्रेष्ठींनी दिले आहेत.
पक्षादेशानुसार काँग्रेस भूमिका घेणार आहे, तर भाजपच्या गोटातून देखील तशीच प्रतिक्रिया युती झाल्यानंतर दिली होती. जि.प. अध्यक्षांचा कार्यकाळ तीन महिने राहिला आहे. यासंदर्भात पक्षनेत्यांच्या आदेशानुसार निर्णय होईल, असे शिवसेनेचे मत आहे.
जिल्ह्यात जि.प., औरंगाबाद पंचायत समिती, कन्नड पंचायत समिती, सोयगाव पंचायत समितीमध्ये शिवसेना काँग्रेससोबत आहे, तर वैजापूर पंचायत समितीमध्ये भाजपसोबत राष्ट्रवादीची आघाडी आहे. जिल्ह्यातील या संस्थांतील शिवसेना आणि भाजपने सोयीनुसार काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेससोबत युती केलेली असली तरी आगामी काळातच त्याबाबत निर्णय होणार आहे, तर जिल्हा परिषदेसह कन्नड, सोयगाव व वैजापूर पंचायत समित्यांमधील सत्ता समीकरण बदलणे शक्य आहे.
प्रदेशाध्यक्षांना भेटणार
युती झाली हे चांगलेच झाले आहे. लोकसभा निवडणुकीत दोन्ही पक्ष एकमताने काम करतील; परंतु काँग्रेसला सोबत घेऊन शिवसेनेने जिल्हा परिषदेत व जिल्ह्यातील संस्थांमध्ये स्थापन केलेल्या सत्तेतून बाहेर पडावे, ही भाजपची भूमिका आहे. भाजप जिथे-जिथे राष्ट्रवादीसोबत असेल, त्याबाबत आम्ही निर्णय घेणार आहोत. यासाठी प्रदेशाध्यक्षांशी चर्चा केली जाईल, असे उपाध्यक्ष डॉ. कराड यांनी सांगितले.