विद्यार्थ्यांच्या सृजनतेला वाव देणारे प्रदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2019 06:21 PM2019-01-18T18:21:00+5:302019-01-18T18:21:25+5:30
पर्यावरणाची हानी, सेंद्रिय शेती करण्याच्या पद्धती, जैविक प्लास्टिक अशा विविध समस्या आणि उपाय प्रयोगातून मांडण्याचा स्तुत्य प्रयत्न शालेय विद्यार्थ्यांनी केला.
औरंगाबाद : पर्यावरणाची हानी, सेंद्रिय शेती करण्याच्या पद्धती, जैविक प्लास्टिक अशा विविध समस्या आणि उपाय प्रयोगातून मांडण्याचा स्तुत्य प्रयत्न शालेय विद्यार्थ्यांनी केला आणि ४४ वे जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यांच्या सृजनतेला वाव देणारे ठरले.
राज्य विज्ञान व गणित शिक्षण संस्था रवीनगर नागपूर, शिक्षण विभाग जिल्हा परिषद, औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने श्री साई तंत्रनिकेतन, एमआयडीसी चिकलठाणा येथे तीनदिवसीय जिल्हास्तरीय प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. शिक्षण सभापती मीना शेळके यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी माध्यमिक शिक्षण अधिकारी बी. बी. चव्हाण, साई तंत्रनिकेतन संस्थेचे अध्यक्ष जे. के. जाधव, विनायक बोरसे, प्राचार्य अरुण सातपुते, उपशिक्षणाधिकारी प्रियाराणी पाटील यांची उपस्थिती होती.
या प्रदर्शनात औरंगाबाद शहरासह विविध तालुक्यांतील विद्यार्थ्यांनी ६२ प्रयोग सादर केले आहेत. शैक्षणिक संसाधने, लोकसंख्या शिक्षण या विषयावर शिक्षकांनी २६, व्यवसाय शिक्षण या विषयावर ७, तर प्रयोगशाळा सहायक या विभागात ३ प्रयोग सादर करण्यात आले. शालेय विद्यार्थ्यांसाठी दि. १९ जानेवारीपर्यंत हे प्रदर्शन खुले आहे.
कृषी आणि जैविक शेती, आरोग्य आणि स्वच्छता, संसाधन व्यवस्थापन, कचरा व्यवस्थापन, वाहतूक आणि दळणवळण (संप्रेषण), गणितीय प्रतिकृती हे विषय विद्यार्थ्यांना प्रयोगासाठी देण्यात आले होते. यापैकी बहुसंख्य विद्यार्थ्यांनी कृषी आणि जैविक शेती, संसाधन व्यवस्थापन या विषयावरील प्रयोग सादर केले आहेत.
चौकट :
जैविक प्लास्टिक या विषयावर वेरूळ येथील गुरुदेव समंतभद्र विद्यामंदिर या शाळेने सादर केलेला प्रयोग नावीन्यपूर्ण होता. यामध्ये विद्यार्थ्यांनी मक्याचे पीठ, व्हिनेगर, ग्लिसरीन आणि पाणी या पदार्थांपासून प्लास्टिकसारखे गुणधर्म असणारी भांडी तयार केली.
पैठण येथील आर्य चाणक्य विद्यामंदिर शाळेने बॉटल ट्री गार्ड उपक रण तयार केले. प्लास्टिकच्या जुन्या बाटल्यांपासून बनविलेले ट्री गार्ड झाडांभोवती बसविल्यामुळे अत्यंत कमी पाण्यातही झाडाला योग्य पाणीपुरवठा कसा होऊ शकतो, हे दाखविण्याचा प्रयत्न करण्यात आला.