पालखी मिरवणूकीसह युद्ध कलेचे प्रात्यक्षिक; क्रांतीचौकात शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात
By बापू सोळुंके | Published: June 6, 2023 12:44 PM2023-06-06T12:44:21+5:302023-06-06T12:45:20+5:30
पालखीत छत्रपती शिवरायांचा छोटा पुतळा होता. पारंपारिक वेशभूषेतील शिवरायांचे मावळे यात सहभागी झाले होते.
छत्रपती संभाजीनगर: उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्यावतीने शहरातील क्रांती चौक येथे शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने क्रांतीचौकात मेघदंबरीवर विराजमान छत्रपती शिवरायांचा पुतळा या सोहळ्याचे मुख्य आकर्षण होते.
या सोहळ्यानिमित्त 18 पगड जातीतील 21 जोडप्यांना आमंत्रित करण्यात आले होते. या जोडप्यांचे हस्ते शिवराज्याभिषेक करण्यात आला. अभिषेकासाठी शरयू, गंगा, काशी, कुशवरता नदीचे पाणी आणण्यात आले होते. पुरोहित सुभाष मुळे यांच्या हस्ते पाच ब्राह्मणांच्या उपस्थितीत हा अभिषेक करण्यात आला. यावेळी 351 नाण्यांचा अभिषेक आणि राजयोग, महारथी, पूजन करण्यात आले.
रणरागिणी ग्रुपतर्फे लाडू वाटप
शहरातील रागिनी शिवाज्ञा प्रतिष्ठान महिला ग्रुपच्यावतीने शिवराज्याभिषेक दिनानिमित्त 3501 लाडू वाटप करण्यात आले. हे लाडू शहरातील विविध अनाथ आश्रमात आणि क्रांती चौकात वाटप करण्यात आले.
शिवकालीन युद्ध कलेचे सादरीकरण
शिवराज्याभिषेक सोहळा निमित्त जयसिंग होलीये यांच्या नेतृत्वाखाली एका पथकाने शिवकालीन युद्ध कलेचे प्रात्यक्षिक सादर केले.यात तलवार, दांडपट्टा, छडीपट्टा, चक्र, तुतारी,भालदार, चोपदार ,नगारे, ढोल ताशे यांचा सहभाग होता.
पालखी मिरवणूकला प्रतिसाद
शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त क्रांती चौक येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पालखी काढण्यात आली. या पालखीत छत्रपती शिवरायांचा छोटा पुतळा होता. पारंपारिक वेशभूषेतील शिवरायांचे मावळे यात सहभागी झाले होते.
सोहळ्यासाठी यांनी घेतला पुढाकार
उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या मध्य विभागाचे शहर प्रमुख बाळासाहेब थोरात यांनी सोहळ्याचे आयोजन केले होते .माजी खासदार चंद्रकांत खैरे ,विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, माजी आमदार कल्याण काळे माजी महापौर नंदू घोडेले, राजू वैद्य ,बंडू ओक, प्राध्यापक चंद्रकांत भरात आणि शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.