छावणी पोलिसांची ‘दंडेलशाही’!
By Admin | Published: November 16, 2014 12:12 AM2014-11-16T00:12:17+5:302014-11-16T00:12:17+5:30
औरंगाबाद : मयत रवींद्रच्या नातेवाईकांना पोलिसांच्या ‘दंडेलशाही’चा सामना करावा लागला.
औरंगाबाद : सावकाराच्या जाचाला वैतागून आत्महत्या करणाऱ्या रवींद्र शेषराव नलावडे (२५, रा, तारांगण, पडेगाव) याला न्याय द्या... त्याला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या सावकार पिता- पुत्राविरुद्ध गुन्हा नोंदवून त्यांना अटक करा, अशी मागणी करण्यासाठी आलेल्या मयत रवींद्रच्या नातेवाईकांना पोलिसांच्या ‘दंडेलशाही’चा सामना करावा लागला. पोलीस निरीक्षक जी.आर. फसले यांच्या आदेशावरून या नातेवाईकांना पोलिसांनी अक्षरश: जनावराप्रमाणे लाठ्या- काठ्यांखाली बेदम झोडपून काढले.
रवींद्रने शुक्रवारी दुपारी शेजाऱ्याच्या फ्लॅटमध्ये फाशी घेऊन आत्महत्या केली होती. आत्महत्येपूर्वी त्याने आपल्या छातीवर, घराच्या भिंतीवर अन् एका सात पानी चिठ्ठीवर ‘सुसाईड नोट’ लिहून ठेवली होती. त्यात त्याने आपल्या आत्महत्येस चेतारामसिंग गुजर आणि देवसिंग गुजर (रा. माजी सैनिक कॉलनी, पडेगाव) हे दोन सावकार जबाबदार असल्याचे लिहिले होते. व्याज आणि भिशीच्या पैशामुळे दोघांनी आपणास आत्महत्येस प्रवृत्त केले. या दोघांना अटक होईपर्यंत माझे प्रेतच उचलू नये, असे लिहिलेले होते.
निष्पापांनाच ‘खाक्या’
त्याचवेळी बाहेर गेलेले पोलीस निरीक्षक फसले तेथे पोहोचले. नातेवाईकांना बघून ‘तुम्हाला सांगितले ना, तुम्ही येथून बाहेर होता की नाही,’ अशा भाषेत निरीक्षकांनी न्यायासाठी बसलेल्या नातेवाईकांना ‘खाक्या’ दाखविला. आधी गुन्हा नोंदवा, अशी मागणी नातेवाईकांनी करताच ‘घ्या रे यांना’ असे फर्मान पोलीस निरीक्षक फसले यांनी सोडले अन् त्यांच्या सोबत असलेले पोलीस मग हाती पडलेल्या चार- पाच निष्पाप नातेवाईकांवर तुटून पडले. लाठ्या- काठ्यांनी बेदम मारहाण करीत पोलीस चार जणांना ठाण्यात घेऊन गेले आणि आतही कपडे काढून बेदम मारहाण करण्यात आली.
पुन्हा निरीक्षक फसले ठाण्याच्या बाहेर येऊन पळालेल्या नोतवाईकांना ‘आणखी कुणाला यायचे का आत,’ असे म्हणू लागले. आपल्यालाही पोलीस पकडतील आणि मारहाण करतील, या भीतीपोटी इतर नातेवाईक दूर जाऊन थांबले. मग पकडून आत नेलेल्या चौघांना काहीवेळ मारहाण केल्यानंतर पोलिसांनी ठाण्यातून हुसकावून लावले.
पोलिसांनी मारहाण केल्याचा प्रकार समजल्यानंतर रवींद्रचे इतर नातेवाईकही छावणी ठाण्यासमोर पोहोचले.
नातेवाईकांच्या बाजूने आ. हर्षवर्धन जाधवही तेथे आले. प्रकरण गंभीर होत असल्याचे लक्षात येताच पोलीस निरीक्षक फसले आणि छावणी पोलिसांचा नूरच बदलला.