जिल्हा परिषद येत्या शैक्षणिक वर्षापासून शाळांमध्ये राबविणार ‘डेन्स फॉरेस्ट’ उपक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2019 06:39 PM2019-05-08T18:39:56+5:302019-05-08T18:41:32+5:30
पर्यावरण संवर्धनासाठी शिक्षण विभागाचा पुढाकार
औरंगाबाद : शाळेतील प्रत्येक मुलावर निसर्ग संवर्धनाचे संस्कार व्हावेत, यासाठी नवीन शैक्षणिक वर्षापासून जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये डेन्स फॉरेस्ट उपक्रम राबविण्यात येणार आहे.
प्रामुख्याने शाळांमध्ये असलेल्या वृक्षांना पाणी देणे, त्यासाठी ‘एक वृक्ष, एक विद्यार्थी’, ‘एक वृक्ष, एक शिक्षक’ हा उपक्रम हाती घेण्यात येणार आहे. डेन्स फॉरेस्ट उपक्रमाच्या माध्यमातून शहर, औद्योगिक परिसरातील शाळांमधील झाडांची जोपासना केल्यास ही झाडे वाढतील, मोठी होतील, अशी अपेक्षा आहे. त्यामुळे जूनपासून हा उपक्रम हाती घेतला जाणार आहे.
माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी डॉ. बी. बी. चव्हाण, प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी सूरजप्रसाद जैस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून १ मे रोजी डेन्स फॉरेस्ट प्रकल्प राबविण्यात आला.
सकाळी ८ ते ९ वाजेदरम्यान सिडको एन-२, एन-६, एन-७ व एन-८ आदी परिसरातील शाळांचे शिक्षक व विद्यार्थ्यांनी शाळा, मुख्य रस्ता, परिसरातील झाडांना पाणी दिले. तत्पूर्वी, अपर आयुक्त शिवानंद टाकसाळे, दोन्ही शिक्षणाधिकारी, वन विभाग तसेच वुई फॉर एन्व्हायर्नमेंटचे प्रतिनिधींच्या उपस्थितीत जिजामाता हायस्कूलच्या प्रांगणात ध्वजवंदन करण्यात आले. त्यानंतर शाळा व परिसरातील झाडांना पाणी दिले. यासाठी एन-५, ६, ७ या परिसरात पाचशे विद्यार्थी, तीनशे शिक्षक बजरंग चौकात एकत्र आले होते.
विद्यार्थ्यांच्या माध्यमातून घराघरांत वृक्षसंवर्धनाचा संदेश पोहोचवणे, हा यामागचा उद्देश होता. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी उपशिक्षणाधिकारी अश्विनी लाटकर, शिक्षण विस्तार अधिकारी रमेश ठाकूर, लईक सोफी, अनिल पवार आदींनी परिश्रम घेतले. या उपक्रमात जिजामाता विद्यालय, धर्मवीर संभाजी विद्यालय, बळीराम पाटील विद्यालय, वेणूताई विद्यालय, सोनामाता विद्यालय, मुकुल मंदिर विद्यालय, क्लेव्हर डेल आदी शाळांचे शिक्षक, विद्यार्थी व शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झाले होते.
झाडांना पाणी
विद्यार्थी, शिक्षक, मुख्याध्यापक, अधिकारी आणि स्वयंसेवी संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी चिश्तिया कॉलनी पोलीस चौकी ते बळीराम पाटील हायस्कूलपर्यंत रस्त्याच्या दुभाजकामधील झाडांना पाणी दिले.