औरंगाबाद जिल्ह्यात आता डेंग्यूचे संकट; २४ तासांत १० रुग्णांचे निदान 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2022 12:35 PM2022-09-14T12:35:25+5:302022-09-14T12:35:42+5:30

ग्रामीण भागातील ६, शहर, जालन्यातील प्रत्येकी २ रुग्ण

Dengue crisis now in Aurangabad district; 10 patients diagnosed within 24 hours | औरंगाबाद जिल्ह्यात आता डेंग्यूचे संकट; २४ तासांत १० रुग्णांचे निदान 

औरंगाबाद जिल्ह्यात आता डेंग्यूचे संकट; २४ तासांत १० रुग्णांचे निदान 

googlenewsNext

औरंगाबाद : कोरोना, स्वाइन फ्लूपाठोपाठ जिल्ह्यात आता डेंग्यूचे संकट अधिक वाढले आहे. जिल्ह्यात गेल्या २४ तासांत डेंग्यूच्या १० रुग्णांचे निदान झाले. यात दोन रुग्ण जालना जिल्ह्यातील आहेत. डेंग्यूच्या रुग्णसंख्येत वाढ झाल्याने आरोग्य यंत्रणेची चिंता वाढली आहे.

शहरात गेल्या १५ दिवसांपासून दररोज पाऊस पडत आहे. त्यामुळे ठिकठिकाणी पावसाचे पाणी साचून डास उत्पत्तीला हातभार लागत आहे. जिल्ह्यात सध्या विषाणूजन्य आजारांसह डेंग्यू आणि डेंग्यूसदृश आजारांनी डोके वर काढले आहे. शासकीय यंत्रणेत नोंद झालेल्या डेंग्यूच्या रुग्णांची संख्या बोटावर मोजता येईल इतकीच आहे, मात्र खासगी रुग्णालयांमध्ये उपचार घेणाऱ्या डेंग्यूसदृश रुग्णांची संख्या अधिक आहे. घराच्या परिसरात पाणी साचू देऊ नये. घरावर रिकामे टायर, भांडी ठेवता कामा नये, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.औरंगाबाद तालुक्यात ३, सोयगाव तालुक्यात एक, खुलताबाद तालुक्यात २ आणि महापालिका हद्दीत ४ रुग्णांचे निदान झाल्याचे जिल्हा हिवताप अधिकारी रवींद्र ढोले यांनी सांगितले.

डेंग्यूची लक्षणे
ताप, तीव्र डोकेदुखी, अंगदुखी, मळमळ, उलट्या, अंगावर पुरळ आणि तीव्र डेंग्यूच्या प्रकारात रक्तस्राव, बेशुद्धावस्था (डीएसएश) अशी डेंग्यूची लक्षणे असल्याची माहिती जिल्हा हिवताप कार्यालयातर्फे देण्यात आली.

फवारणी, ॲबेटिंग सुरू
शहरात महापालिकेकडून आवश्यक ती खबरदारी घेतली जात आहे. फवारणी, ॲबेटिंग सुरू आहे. नागरिकांनी आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळावा. घराशेजारी पाणी साचणार नाही, याची काळजी घ्यावी, असे आवाहन महापालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डाॅ. पारस मंडलेचा यांनी केले.

नागरिकांनी काळजी घ्यावी
जिल्ह्यात दिवसभरात डेंग्यूच्या १० रुग्णांची वाढ झाली आहे. यात २ महापालिका हद्दीतील आणि २ जालना जिल्ह्यातील आहेत, असे जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. अभय धानोरकर यांनी सांगितले.

Web Title: Dengue crisis now in Aurangabad district; 10 patients diagnosed within 24 hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.