औरंगाबादमध्ये ‘डेंग्यू’चे सात दिवसांत सात रुग्ण आढळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2019 07:27 PM2019-07-09T19:27:11+5:302019-07-09T19:28:50+5:30
डासांचा प्रादुर्भाव वाढल्याने मलेरियासदृश रुग्णांतही होतेय वाढ
औरंगाबाद : शहर आणि जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत पडलेल्या पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साचले आहे. या पाण्यामुळे डासांची उत्पत्ती होण्यास हातभार लागत असल्याने डेंग्यू आणि मलेरियासदृश आजारांनी शिरकाव केला आहे. जुलै महिन्याच्या अवघ्या ७ दिवसांत ७ जणांना डेंग्यूची लागण झाल्याचे समोर आले आहे, तर घाटीत दररोज ५ ते ६ मलेरियासदृश रुग्ण दाखल होत आहेत.
पावसाळ्याला सुरुवात होताच कोरडा दिवस, धूरफवारणीसह विविध उपाय राबविण्यावर भर दिला जातो; परंतु अवघ्या काही दिवसांच्या पावसानंतरच औरंगाबाद शहर आणि जिल्ह्यात डेंग्यू आणि डेंग्यूसदृश रुग्ण आढळून येत आहेत. शहराबरोबरच ग्रामीण भागात स्वच्छता मोहीम, घरांचे सर्वेक्षण करणे, डास नष्ट होण्यासाठी विविध उपाययोजना, कोरडा दिवस, धूरफवारणी यासह शाळा-महाविद्यालयांमध्ये जनजागृतीपर विविध कार्यक्रम राबविण्यात येत आहेत, तरीही डेंग्यूने डोके वर काढायला सुरुवात केली आहे. जुलै महिन्यात आतापर्यंत डेंग्यूचे ७ रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये दोन रुग्ण ग्रामीण भागातील, तर पाच रुग्ण हे शहरातील असल्याची माहिती जिल्हा हिवताप कार्यालयातर्फे देण्यात आली.
पावसाळ्यात कीटकजन्य आजारांचा संभाव्य उद्रेक टाळण्यासाठी आरोग्य उपसंचालक, तसेच जिल्हा हिवताप कार्यालयातर्फे विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. जिल्ह्यातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना विविध सूचना करण्यात आल्या आहेत, तसेच नागरिकांनी घराचा परिसर स्वच्छ ठेवणे, आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळणे, असे आवाहन जिल्हा हिवताप कार्यालयातर्फे क रण्यात आले आहे.
‘ओआरएस’चा तुटवडा
जलजन्य आजारांच्या रुग्णासाठी ‘ओआरएस’ महत्त्वपूर्ण ठरते; परंतु घाटीत सध्या त्याचा तुटवडा आहे. याविषयी अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर म्हणाल्या, साथरोगांच्या दृष्टीने घाटीत औषधी उपलब्ध आहेत. ‘ओआरएस’ची स्थानिक पातळीवर खरेदी केली जात आहे.
नागरिकांनी काळजी घ्यावी
पावसाळ्याच्या कालावधीत पाणीसाठ्यात वाढ होत असल्याने डासांमध्ये आणि डासांमुळे हिवताप, डेंग्यू, चिकुनगुन्यासारख्या आजारांत वाढ होत असते. रुग्णांची संख्या नियंत्रणात असली तरी नागरिकांनीदेखील काळजी घेणे आवश्यक आहे.
-अनिल पाटील, जिल्हा हिवताप अधिकारी
औषधींना प्रतिसाद
घाटीत डायरियाचे दररोज ३ ते ४ रुग्ण दाखल होत आहेत, तर मलेरियासदृश ५ ते ६ रुग्ण येत आहेत. घाटीत पुरेसा औषधीसाठा उपलब्ध आहे. रुग्णांना मलेरियाची औषधी दिली जात असून, त्याला प्रतिसाद मिळत असल्याने रुग्णांच्या प्रकृतीत सुधारणा होते.
- डॉ. मीनाक्षी भट्टाचार्य, विभागप्रमुख, मेडिसिन विभाग, घाटी