अखेर आरोग्य यंत्रणा हलली, कोरोनाबरोबरच डेंग्यू रोखण्यासाठी लागली कामाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2021 01:11 PM2021-09-22T13:11:31+5:302021-09-22T13:19:01+5:30
dengue increased in Aurangabad : शहरात २०१९ मध्ये डेंग्यूचा उद्रेक रोखण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाने कृती आराखडा तयार केला होता. आता पुन्हा एकदा त्या आराखड्याचा आढावा घेऊन नवीन कृती आराखडा तयार करण्यात येणार आहे.
औरंगाबाद : डेंग्यूचा कहर वाढल्याने शहरात प्लेटलेटची मागणी वाढली आहे. प्रत्येक रक्तपेढीत रोज ३० ते ४० प्लेटलेट पिशव्यांची मागणी होत आहे. डेंग्यूच्या वाढत्या प्रादुर्भावाने आरोग्य यंत्रणा अखेर हलली. सार्वजनिक आरोग्य विभागाने नियंत्रण कक्ष सुरू केला असून, कोरोनाच्या पाठोपाठ आता डेंग्यूला रोखण्यासाठी कृती आराखडा तयार करण्यात येत आहे. महापालिका प्रत्येक झोनमध्ये मोहीम राबवित आहे.
शहरात २०१९ मध्ये डेंग्यूचा उद्रेक रोखण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाने कृती आराखडा तयार केला होता. आता पुन्हा एकदा त्या आराखड्याचा आढावा घेऊन नवीन कृती आराखडा तयार करण्यात येणार आहे. घाटी रुग्णालयातील मेडिसीन विभागप्रमुख डाॅ.मीनाक्षी भट्टाचार्य म्हणाल्या, साधारण व्यक्तीमध्ये प्लेटलेटचे प्रमाण (काउंट) हे १.५ ते ५.५ लाख असतात. प्लेटलेट २० हजारांपेक्षा खाली येणे ही धोक्याची पातळी असते, तर १० हजारांखाली गेल्यानंतर रुग्णाला प्लेटलेट द्यावे लागतात. घाटीत प्लेटलेट कमी झालेले रुग्ण दाखल होत आहेत.
तत्काळ कार्यवाही
डेंग्यू रोखण्यासाठी नवीन कृती आराखडा तयार करण्यात येत आहे. त्याचबरोबर, २०१९ मध्ये तयार केलेल्या आराखड्याची माहिती घेतली जाईल. तो आराखडा चांगला असेल, तर तोही राबविला जाईल. नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आला असून, कुठेही रुग्ण वाढले, तर तत्काळ कार्यवाही केली जाईल.
- रवींद्र ढोले, जिल्हा हिवताप अधिकारी.
प्रत्येक झोनमध्ये मोहीम
डेंग्यूचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे गेल्या ४ दिवसांपासून एका दिवशी एका झोनमध्ये १०० ते १२५ कर्मचारी डेंग्यू नियंत्रण मोहीम राबवित आहेत. आतापर्यंत ५ झोन पूर्ण झाले आहेत. ॲबेटिंग, धूर फवारणी केली जात असून, परिस्थिती नियंत्रणात आहे.
- डाॅ.पारस मंडलेचा, आरोग्य वैद्यकीय अधिकारी, मनपा.
रोज ४० पिशव्या प्लेटलेट
साधारण रोज ४० रँडम डोनर प्लेटलेटच्या पिशव्या लागत आहेत, तर २ ते ३ सिंगल डोनर प्लेटलेटची मागणी आहे. प्लेटलेटची मागणी पाहता, अधिकाधिक नागरिकांनी रक्तदान करणे आवश्यक आहे.
- डाॅ.मंजुषा कुलकर्णी, दत्ताजी भाले रक्तपेढी.
प्लेटलेटची एकच बॅग
सोमवारी ३४ प्लेटलेट बॅग देण्यात आल्या. सध्या प्लेटलेटची एकच बॅग शिल्लक आहे. रक्तपेढीत पुढील ५ ते ६ दिवस पुरेल, इतका रक्तसाठा उपलब्ध आहे. दात्यांनी रक्तदानासाठी पुढे यावे.
- हनुमान रुळे, जनसंपर्क अधिकारी, विभागीय रक्तपेढी.