शहरात डेंग्यू,मलेरियाचा शिरकाव
By Admin | Published: June 28, 2017 12:43 AM2017-06-28T00:43:00+5:302017-06-28T00:50:38+5:30
औरंगाबाद : शहर आणि परिसरात गेल्या काही दिवसांत पडलेल्या पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साचले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : शहर आणि परिसरात गेल्या काही दिवसांत पडलेल्या पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साचले आहे. या साचलेल्या पाण्यामुळे डासांची उत्पत्ती होण्यास हातभार लागत असल्याने शहर आणि परिसरात डेंग्यू आणि मलेरियाने शिरकाव केला आहे. महिनाभरात चार जणांना डेंग्यू, तर एकाला मलेरियाची लागण झाल्याचे समोर आले आहे.
पावसाळ्याला सुरुवात होताच कोरडा दिवस, धूरफवारणीसह विविध उपाय राबविण्यावर भर दिला जात आहे; परंतु पहिल्या, दुसऱ्या पावसानंतरच औरंगाबाद शहर आणि जिल्ह्यात डेंग्यू आणि डेंग्यूसदृश रुग्ण आढळून येत आहेत.
शहराबरोबरच ग्रामीण भागात स्वच्छता मोहीम, घरांचे सर्वेक्षण करणे, डास नष्ट होण्यासाठी विविध उपाययोजना, कोरडा दिवस, धूर फवारणी यासह शाळा-महाविद्यालयांमध्ये जनजागृतीपर विविध कार्यक्रम राबविण्यात येत आहे. तरीही डेंग्यूने डोके वर काढायला सुरुवात केली आहे.
महिनाभरात शहरातील गांधीनगर, वानखेडेनगर आणि एन-११ परिसरात डेंग्यूचा प्रत्येकी एक असे तीन पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले, तसेच खुलताबाद येथे डेंग्यूचा एक पॉझिटिव्ह रुग्ण आढळला, तर शहरातील गजानननगरमध्ये मलेरियाचा एक रुग्ण समोर आल्याची माहिती जिल्हा हिवताप कार्यालयातर्फे देण्यात आली.
पावसाळ्यात कीटकजन्य आजारांचा संभाव्य उद्रेक टाळण्यासाठी आरोग्य उपसंचालक, तसेच जिल्हा हिवताप कार्यालयातर्फे विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. जिल्ह्यातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना विविध सूचना करण्यात आल्या आहेत, तसेच नागरिकांनी घराचा परिसर स्वच्छ ठेवणे, आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळणे, असे आवाहन जिल्हा हिवताप कार्यालयातर्फे क रण्यात आले आहे.