दहा जणांना डेंग्यू
By Admin | Published: May 17, 2014 12:35 AM2014-05-17T00:35:28+5:302014-05-17T00:58:13+5:30
वसमत : तालुक्यातील थोरावा गावातील ग्रामस्थांना डेंग्यूची लागण झाली असून नांदेड व परभणी येथील खासगी दवाखान्यात हे रूग्ण उपचार घेत आहेत.
वसमत : तालुक्यातील थोरावा गावातील ग्रामस्थांना डेंग्यूची लागण झाली असून नांदेड व परभणी येथील खासगी दवाखान्यात हे रूग्ण उपचार घेत आहेत. डेंग्यूच्या रूग्णांची संख्या वाढत असली तरी अद्याप तालुका आरोग्य अधिकारी या गावाकडे फिरकलेही नाहीत. थोरावा येथील तापाने फणफणनार्या रुग्णांना नांदेडला हलविण्यात आले असता रक्त तपासणीत ‘डेंग्यू’ असल्याचे समोर आले. सदर रूग्णांच्या प्लेटलेटस् कमी होत आहेत. अशा आजाराचे १० ते १२ रूग्ण नांदेड व परभणी येथील खासगी रूग्णालयात उपचार घेत आहेत. आठ दिवसांपासून हा प्रकार सुरू आहे. दोन दिवसांपूर्वी हयातनगर प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. शिराळे व कर्मचारी गावात दाखल झाले. रक्तनमुने व सर्वे करण्यात आला. ग्रामस्थांना डेंग्यूची माहिती देऊन पाणीसाठे कोरडे करण्याचा सल्ला या पथकाने दिला. दोन महिन्यांपूर्वी नवोदय विद्यालयातील एका विद्यार्थिनीचा डेंग्युने बळी घेतल्याची घटना घडली होती. हयातनगर प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. शिराळे यांच्याशी संपर्क साधला असता, थोरावा येथे रक्त नमुने घेण्याचे व सर्र्वेेचे काम करण्यात आल्याचे व केलेल्या कारवाईचा अहवाल तालुका आरोग्य कार्यालयास पाठवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. (वार्ताहर)