सिल्लोड तालुक्यात डेंग्यूचे थैमान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2018 12:24 AM2018-12-04T00:24:18+5:302018-12-04T00:24:46+5:30
तालुक्यात डेंग्यूने थैमान घातले असून सिल्लोड शहरात ३ खाजगी रुग्णालयात सोमवारी ८ डेंग्यूचे रुग्ण दाखल झाले. त्यापैकी एकाला औरंगाबाद येथे हलविण्यात आले असून ७ रुग्ण सिल्लोड शहरात उपचार घेत आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
सिल्लोड : तालुक्यात डेंग्यूने थैमान घातले असून सिल्लोड शहरात ३ खाजगी रुग्णालयात सोमवारी ८ डेंग्यूचे रुग्ण दाखल झाले. त्यापैकी एकाला औरंगाबाद येथे हलविण्यात आले असून ७ रुग्ण सिल्लोड शहरात उपचार घेत आहेत.
गेल्या २ महिन्यात केवळ ३ खाजगी रुग्णालयात तब्बल २७० डेंग्यूच्या रुग्णांनी उपचार घेतले आहे. आरोग्य विभाग यापासून अनभिज्ञ दिसत आहे. सिल्लोड येथील उपजिल्हा रुग्णालयात रुग्ण दाखल होत नसले तरी गेल्या दोन महिन्यात सिल्लोड शहरातील खाजगी रुग्णालय खचाखच भरले होते. आणखी रुग्ण वाढू नये, यासाठी वेळीच उपाय करणे गरजेचे आहे. तालुक्यातील अजिंठा, भराडी, शिवना, घाटनांद्रा, बाळापूर सर्कलमध्ये डेंग्यूचे रुग्ण जास्त आहेत. सिल्लोड शहरातील एका खाजगी दवाखान्यात अजिंठा येथील अनुज शांताराम नवगिरे (१२), प्राची शांताराम नवगिरे (९) यांच्यावर उपचार सुरु असून त्यांना डेंग्यू झाल्याचा अहवाल आला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. हे दोघे बहिण-भाऊ आहेत.
सिल्लोड शहरातील दुसऱ्या खाजगी दवाखान्यात सहर पठाण (भराडी), तुषार फुके (वझरखेडा) हे दोन रुग्ण दाखल झाले होते. पैकी प्रकृती गंभीर असल्याने सहर पठाण यांना उपचारासाठी औरंगाबाद येथे हलविण्यात आले आहे. सिल्लोड शहरातील एका बाल रुग्णालयात सोमवारी ४ रुग्ण उपचार घेत असल्याची माहिती डॉ. गोठवाल यांनी दिली. ३ महिन्यात डेंग्यूचे तब्बल १५० रुग्ण दाखल झाल्याची माहिती सिल्लोडचे बालरोग तज्ज्ञ डॉ. तौसिफ अहेमद पठाण, डॉ. सचिन पंडित यांनी दिली. सिल्लोड येथील उपजिल्हा रुग्णालयाकडे डेंग्यूच्या रुग्णांनी पाठ फिरविल्याचे दिसते. मागील महिन्यात येथे ४ रुग्ण आले होते, असे वैद्यकीय अधीक्षक डॉ. एम. एस. सरदेसाई यांनी सांगितले.
सिल्लोड शहरात स्वच्छता राहावी म्हणून नगर परिषदेने साफसफाई केली आहे. याशिवाय गेल्या १५ दिवसांपासून शहरात धूर फवारणी सुरु आहे. नागरिकांनी आठवड्यातून एक दिवस कोरडा पाळावा, असे आवाहन न.प.ने केले आहे.