जिल्ह्यात दोन विद्यार्थिनींचा डेंग्यू, तापाने मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2017 12:34 AM2017-09-13T00:34:40+5:302017-09-13T00:34:40+5:30
पांगरी ता़ अर्धापूर येथील ऋतुजा दुधाटे व मनाठा येथील वर्षा मुरमुरे या विद्यार्थिनींचा अनुक्रमे डेंग्यू व तापाने मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना ११ सप्टेंबर रोजी घडली़
लोकमत न्यूज नेटवर्क
हदगाव/अर्धापूर : पांगरी ता़ अर्धापूर येथील ऋतुजा दुधाटे व मनाठा येथील वर्षा मुरमुरे या विद्यार्थिनींचा अनुक्रमे डेंग्यू व तापाने मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना ११ सप्टेंबर रोजी घडली़
पांगरी येथील ऋतुजा दुधाटे ही मीनाक्षी देशमुख विद्यालय, अर्धापूर येथे ९ वी वर्गात शिकत होती़ ८ सप्टेंबर रोजी ती पायाभूत चाचणी परीक्षेतील गणिताचा पेपर देऊन घरी आली़ त्याच दिवशी पोटात दुखत असल्यामुळे तिला नांदेडात एका खाजगी रुग्णालयात दाखल केले होते़ दोन दिवसांच्या उपचारानंतर ११ सप्टेंबर रोजी पहाटे ऋतुजाचा मृत्यू झाला़ तिला डेंग्यू झाला होता, असे रुग्णालयीन सूत्रांनी सांगितले़
दरम्यान, मनाठा ता़ हदगाव येथील वर्षा चांदू मुरमुरे या मुलीचा तापाने ११ सप्टेंबर रोजी मृत्यू झाल्याची घटना घडली़ ती मनाठा येथील आदर्श विद्यालयात ८ वी मध्ये शिकत होती़ तीन दिवसांपूर्वी तिला ताप आला होता़ त्यामुळे ती शाळेत गेली नाही़ मनाठा येथे उपचाराची सोय नसल्याने डोंगरकडा ताक़ळमनुरी येथील एका खाजगी रुग्णालयात नेले़ संबंधित डॉक्टरांनी तिला काही गोळ्या दिल्या़ या दरम्यान, अंगात ताप मुरून तिचा मृत्यू झाला़ हदगाव व अर्धापूर तालुक्यात आरोग्य सुविधांची मोठी समस्या आहे़ अनेक डॉक्टर मुख्यालयी राहून कर्तव्य बजावत नसल्याच्या तक्रारी आहेत़ मनाठा येथील आरोग्य उपकेंद्र नावालाच आहे असा आरोप रुग्णांच्या नातेवाईकांनी केला़ दर महिन्याला विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी शाळेत व्हायला पाहिजे असा शासनाचा नियम आहे़ मात्र ती न झाल्याने वर्षाचा मृत्यू झाल्याचा आरोप होत आहे़ याला शाळेचे मुख्याध्यापक माधव रावळे यांनीही दुजोरा दिला़ आॅगस्टमध्ये डॉक्टर आले होते, त्यांनी विद्यार्थ्यांची यादी मागवली़ त्यानंतर तपासणीसाठी येतो असे त्यांनी सांगितले़ मात्र अद्यापही डॉक्टर आले नाहीत़