घरचे जेवण नाकारले; कैद्यांनी केली पोलिसांना मारहाण
By Admin | Published: April 9, 2016 12:38 AM2016-04-09T00:38:15+5:302016-04-09T00:53:22+5:30
औरंगाबाद : जिल्हा न्यायालयात हजर केलेल्या दोन कैद्यांना त्यांच्या घरून आलेले जेवण नाकारले म्हणून त्यांनी पोलिसांना मारहाण केली.
औरंगाबाद : जिल्हा न्यायालयात हजर केलेल्या दोन कैद्यांना त्यांच्या घरून आलेले जेवण नाकारले म्हणून त्यांनी पोलिसांना मारहाण केली. ही घटना जिल्हा न्यायालयासमोर जालना रोडवर ७ एप्रिल रोजी सायंकाळी ५.३० वाजता घडली. या प्रकरणी शासकीय कामात अडथळा निर्माण केला म्हणून दोन्ही कैद्यांविरुद्ध क्रांतीचौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कैद्यांना न्यायालयात आणि घाटीत घेऊन जाणाऱ्या पोलिसांना मारहाण करण्यात आल्याच्या घटना यापूर्वीही घडलेल्या आहेत.
आदिल चाऊस, सचिन गायकवाड अशी त्या कैद्यांची नावे आहेत. ते सध्या हर्सूल कारागृहात आहेत. याबाबत पोलिसांनी सांगितले की, मुख्यालयातील पोहेकॉ. सुभाष नारायण भालेराव यांच्यासह इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी हर्सूल कारागृहातून आदिल चाऊस आणि सचिन गायकवाड या दोन कैद्यांना गुरुवारी जिल्हा न्यायालयात हजर केले होते.
न्यायालयातील काम पूर्ण झाल्यानंतर भालेराव हे कैद्यांना पोलीस गाडीत बसवून पुन्हा हर्सूल कारागृहाकडे घेऊन जात होते. त्याच वेळी कैद्यांनी घरून आणलेले जेवण घ्यायचे असल्याचे पोलिसांना सांगितले. त्यांना पोलिसांनी विरोध केला असता कैद्यांनी पोलिसांना शिवीगाळ करून मारहाण केली.
या प्रकरणी गुरुवारी रात्री क्रांतीचौक ठाण्यात कैद्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हवालदार काळे करीत आहेत.