दंतोपचाराला हवी विम्याची ‘बळकटी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2019 06:43 PM2019-08-01T18:43:15+5:302019-08-01T18:45:46+5:30

मौखिक स्वच्छता दिन : मौखिक स्वच्छतेला आली आधुनिकतेची ‘चकाकी’

Dental care requires 'strengthening' insurance | दंतोपचाराला हवी विम्याची ‘बळकटी’

दंतोपचाराला हवी विम्याची ‘बळकटी’

googlenewsNext
ठळक मुद्दे१० व्यक्तींमागे ८ जणांना हिरड्यांचे आजार असतात. १० व्यक्तींमागे ८ जणांना हिरड्यांचे आजार असतात.

- संतोष हिरेमठ 

औरंगाबाद : ‘उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म’ असे आपल्याकडे म्हटले जाते. ज्या मुखाद्वारे अन्नग्रहण केले जाते, निरोगी आयुष्यासाठी त्याचे आरोग्य राखणे महत्त्वपूर्ण आहे. त्यासाठी मुखाची नियमित आणि योग्य पद्धतीने स्वच्छता होणे गरजेचे आहे. बदलत्या जीवनशैलीत अनेक गोष्टींमध्ये आधुनिकता रुजली आहे. मौखिक स्वच्छतेमध्येही पारंपरिक साधनांबरोबर आता आधुनिक साधनांनी शिरकाव केला आहे. परदेशांप्रमाणे भारतातही दंतोपचाराला विम्याची बळकटी मिळण्याची गरज असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले.

भारतात दरवर्षी १ आॅगस्ट रोजी डॉ. जी. बी. शंकवाळकर यांच्या जयंतीनिमित्त मौखिक स्वच्छतेसंदर्भात जनजागृती होण्यासाठी मौखिक स्वच्छता दिन पाळण्यात येतो. मौखिक स्वच्छता म्हणजे दोन हिरड्या, जीभ, टाळू व गालाच्या आतील भाग या सर्व अवयवांची स्वच्छता करणे होय. मौखिक स्वच्छतेअभावी हिरड्यांचे आजार, दंतक्षय, मुख दुर्गंधीला सामोरे जावे लागते.  अन्नग्रहण करताना दातांमध्ये त्याचे कण अडकतात. त्यातून जिवाणूची निर्मिती होते आणि मुख दुर्गंधीसह अनेक प्रकारच्या आरोग्य समस्या निर्माण होतात. त्यामुळे दातांची निगा आणि पर्यायाने मुख आरोग्याकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे.

बाभळी, कडुनिंबाची काडी, तसेच राख आणि कोळसा, मिश्रीचा वापर मागे पडून मंजन, टूथपेस्ट, ब्रश आले. आता डेंटल फ्लॉस (नायलॉनचा धागा), माऊथ वॉश, वॉटर जेटस् (दात स्वच्छ करण्याचे उपकरण) यांचा प्रवेश झाला आहे. ग्रामीण भागात टूथपेस्ट आणि ब्रश यांचा वापर करण्याचे प्रमाण आजही कमीच आहे, असे तज्ज्ञांनी सांगितले. १० व्यक्तींमागे ८ जणांना हिरड्यांचे आजार असतात. परंतु त्याविषयी जनजागृतीचा अभाव दिसतो. वेदना असेल तरच उपचार घेण्यास प्राधान्य दिले जाते. परंतु अनेकदा वेदना नसतात. काहींकडून विम्याची सुरुवात झाली आहे. मुख आरोग्याबरोबर शारीरिक आरोग्याकडे दुर्लक्ष करता कामा नये, असे डॉ. सी. डी. ढालकरी यांनी सांगितले 

मुख कर्करोगाचे ४०% रुग्ण 
माऊथ वॉश डॉक्टरांनी लिहून दिल्यानंतरच वापरले पाहिजे. कर्करोगाच्या एकूण रुग्णांमध्ये ४० टक्के रुग्ण हे मुखकर्करोगाचे असतात. सकाळी आणि रात्री झोपण्यापूर्वी दात स्वच्छ केले पाहिजे. समतोल आहार घेतला पाहिजे. नियमित सहा महिन्यांनी डॉक्टरांकडून तपासणी केली पाहिजे.
- डॉ. माया इंदूरकर, विभागप्रमुख, दंत परिवेष्टणशास्त्र विभाग, शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय

विम्याचे कवच मिळावे
दंतोपचारासाठी लागणारी रक्कम ऐकून अनेक जण दंतोपचार घेण्याचे टाळतात. परदेशांमध्ये दातांसाठी विमा आहे. मात्र, भारतात अद्यापही विमा पद्धत रुजलेली नाही. दंतोपचारासाठी विम्याची नितांत गरज आहे. तंबाखू, गुटखा, खर्रा खाणे टाळले पाहिजे. आहारातील बदलाने दातांच्या स्वच्छतेसाठी अनेक बाबी आल्याचे जाणवते.
- डॉ. सुषमा सोनी, अध्यक्षा, इंडियन डेंटल असोसिएशन, औरंगाबाद

Web Title: Dental care requires 'strengthening' insurance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.