सहयोगी प्राध्यापकाकडून लाच घेताना दंत महाविद्यालयाचा कार्यालयीन अधीक्षक, कारकून अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2019 09:26 PM2019-10-19T21:26:36+5:302019-10-19T21:28:15+5:30
कनिष्ठ लिपिकामार्फत ८ हजार रुपये लाच घेतांना अटक
औरंगाबाद : सहयोगी प्राध्यापक आणि त्यांच्या दोन मित्राचे अनुभव प्रमाणपत्र आणि बंधमुक्त प्रमाणपत्र देण्यासाठी कनिष्ठ लिपिकामार्फत ८ हजार रुपये लाच घेतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शासकीय दंत महाविद्यालयाच्या कार्यालयीन अधीक्षकास अटक केली. हा सापळा शासकीय दंत महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या अस्थापना शाखेत शनिवारी (दि.१९) रचण्यात आला होता.
कार्यालयीन अधीक्षक चंद्रकांत यादवराव बनसोडे (५०) आणि कनिष्ठ लिपीक शिवकुमार शिवलिंग पदरे (२८)अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. याविषयी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक बी.व्ही.गावडे यांनी सांगितले की, तक्रारदार हे शासकीय दंत महाविद्यालय आणि रुग्णालयात सहायक प्राध्यापक आहेत. त्यांना आणि त्यांच्या दोन मित्रांनी शासनाच्या नियमानुसार शासकीय सेवा केली असल्याने त्यांना बंधमुक्त प्रमाणपत्र आणि अनुभव प्रमाणपत्राची आवश्यकता होती. याकरीता त्यांनी कार्यालयीन अधीक्षक चंद्रकांत बनसोडे आणि अस्थापना शाखेचे लिपीक शिवकुमार पदरे यांची भेट घेतली. तेव्हा त्यांनी त्यांच्याकडे प्रती व्यक्ती ५ हजार रुपये या प्रमाणे १५ हजार रुपये लाचेची मागणी केली.
तक्रारदार यांची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदविली. तेव्हा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी पंच पाठवून लाचेच्या मागणीची पडताळणी केली. आरोपींनी तडजोड करीत तक्रारदार आणि त्याच्या एका मित्राचे काम करण्यासाठी प्रत्येकी चार हजार रुपये याप्रमाणे ८ हजार रुपये लाच मागितली. १९ आॅक्टोबर रोजी पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया, अप्पर अधीक्षक अनिता जमादार , उपअधीक्षक बी.व्ही. गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गणेश धोक्रट यांनी आरोपींना रंगेहात पकडण्यासाठी दंत महाविद्यालयात सापळा रचला. तेव्हा तक्रारदार यांच्याकडून शिवकुमार पदरे यांनी ८ हजार रुपये लाच घेतली. पदरे यांनी लाचेची रक्कम स्विकारातच दबा धरून बसलेल्या साध्या वेशातील पोलिसांनी पदरे यांना लाचेच्या रक्कमेसह रंगेहात पकडले आणि बनसोडे यांना त्यांच्या कक्षातून ताब्यात घेतले. याविषयी बेगमपुरा पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया रात्री उशीरापर्यंत सुरू होती.