पंचायत, कृषी, पशुसंवर्धन विभाग आठवडाभरात डीआरडीएच्या परिसरात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2021 04:06 AM2021-02-16T04:06:36+5:302021-02-16T04:06:36+5:30
औरंगाबाद : जिल्हा परिषदेच्या नव्या प्रशासकीय इमारतीच्या जागा बदलाचा प्रस्ताव राज्य शासनाकडे दाखल करण्यात आला आहे. त्याला मंजुरी मिळताच ...
औरंगाबाद : जिल्हा परिषदेच्या नव्या प्रशासकीय इमारतीच्या जागा बदलाचा प्रस्ताव राज्य शासनाकडे दाखल करण्यात आला आहे. त्याला मंजुरी मिळताच निविदा प्रक्रिया होईल. त्यापूर्वी नियोजित जागेवरील असलेली कार्यालये स्थलांतरित करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. शिक्षण व आरोग्य विभागाचे स्थलांतर झाले असून, पंचायत, कृषी, पशुसंवर्धन हे विभाग जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या (डीआरडीए) परिसरातील अधिकारी निवासस्थानात पुढील आठवड्यापर्यंत स्थलांतरित होतील, अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. मंगेश गोंदवले यांनी दिली.
घाटीसमोरील डीआरडीएच्या परिसरात कार्यालय स्थलांतरणासाठी केलेल्या निवासस्थानांची दुरुस्ती, रंगरंगोटी, विद्युतीकरण, सुविधांची पाहणी डाॅ. गोंदवले यांनी सोमवारी केली. तसेच सुंदर माझे कार्यालयअंतर्गत परिसर स्वच्छतेचा आढावा घेतला. यावेळी परिसरातील खासगी भंगार वाहने हटवा, शासकीय भंगार वाहनांची कार्यालयांना अडचण होणार नाही, अशा ठिकाणी हलवण्याच्या सूचना दिल्या. तसेच स्वच्छता, निवासस्थानांच्या दुरवस्थेवर बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. डीआरडीए प्रकल्प संचालक कार्यालय मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनासाठी योग्य राहील व डीआरडीएचे कार्यालय इतरत्र हलवण्याचे नियोजन ठेवा, असेही त्यांनी सांगितले. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष कवडे, डीआरडीएच्या प्रकल्प संचालक संगीताराणी पाटील, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता झेड ए. काझी. उपअभियंता डहाळे यांच्यासह अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
---
सोयीचे ठिकाण म्हणून पर्याय
घाटीसमोरचा डीआरडीएच्या परिसरात पार्किंगची व्यवस्था आहे. शिवाय हे ठिकाण स्थलांतरण व नागरिकांसाठी सोयीस्कर असून, पूर्वी नव्या इमारतीचा प्रस्ताव याच ठिकाणी होता. त्याला प्रशासकीय मान्यता मिळाली. मात्र, ही जागा बदलून जिल्हा परिषदेच्या मुख्य इमारतीच्या मागच्या बाजूस ही इमारत उभारण्याचे नियोजन आहे. त्याचा जागा बदलचा प्रस्ताव मान्य होताच निविदा प्रक्रिया झाल्यावर कोणतेही अडथळे नको, वेळ वाया जायला नको, यासाठी स्थलांतरणावर जोर दिला जात असल्याचे डाॅ. गोंदावले यांनी सांगितले.