मेंटेनन्ससाठी एक दिवस बंद राहणार विभागीय क्रीडा संकुल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2019 12:34 AM2019-03-05T00:34:31+5:302019-03-05T00:35:16+5:30
गारखेडा परिसरातील विभागीय क्रीडा संकुल हे मेंटेनन्ससाठी एक दिवस बंद राहणार आहे. याची ट्रायल रविवारी घेण्यात आली; परंतु पहाटे फिटनेससाठी येणाऱ्या नागरिक व खेळाडूंना याची माहिती देण्यात आली नव्हती. त्यामुळे खेळाडू, नागरिक आणि लोकप्रतिनिधींनी याविषयी संताप व्यक्त केला होता. त्यामुळे पाऊणतासानंतर विभागीय क्रीडासंकुल नागरिकांसाठी रविवारी खुले ठेवण्यात आले.
औरंगाबाद : गारखेडा परिसरातील विभागीय क्रीडा संकुल हे मेंटेनन्ससाठी एक दिवस बंद राहणार आहे. याची ट्रायल रविवारी घेण्यात आली; परंतु पहाटे फिटनेससाठी येणाऱ्या नागरिक व खेळाडूंना याची माहिती देण्यात आली नव्हती. त्यामुळे खेळाडू, नागरिक आणि लोकप्रतिनिधींनी याविषयी संताप व्यक्त केला होता. त्यामुळे पाऊणतासानंतर विभागीय क्रीडासंकुल नागरिकांसाठी रविवारी खुले ठेवण्यात आले. याविषयी प्रभारी क्रीडा उपसंचालक आणि विभागीय क्रीडा संकुल समितीचे सचिव अशोक गिरी यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, ‘‘विभागीय क्रीडासंकुल हे मेंटेनन्ससाठी आठवड्यातून एकदिवस बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे याची ट्रायल म्हणून विभागीय क्रीडा संकुल पाऊणतास बंद ठेवण्यात आले होते; परंतु नागरिकांच्या मागणीनंतर हे खुले करण्यात आले होते. रविवारी आम्हाला वेळ असतो. त्यामुळे या दिवशी क्रीडासंकुल बंद ठेवू नये, अशी मागणी नागरिकांमधून करण्यात आली होती. त्यामुळे मेंटेनन्ससाठी आता कोणत्या दिवशी क्रीडा संकुल बंद ठेवायचे, याचा निर्णय लवकर घेण्यात येईल.’’ दरम्यान विभागीय क्रीडा संकुलात आता ज्यांच्याकडे ओळखपत्र आहे अशांनाच सोडण्यात येत आहे. त्यामुळे ओळखपत्र तयार करून घेणाऱ्यांच्याही संख्येत वाढ झाली असल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे क्रीडा उपसंचालक राजकुमार यांच्या जागेवर अशोक गिरी यांच्याकडे विभागीय क्रीडा संकुल समितीचे सचिवपद देण्यात आले आहे. त्याचप्रमाणे राजकुमार महादावाड हे रजेवर असल्यामुळे प्रभारी क्रीडा उपसंचालकाचा पदभारही अशोक गिरी यांच्याकडे आला आहे.