मराठा आरक्षण दिंडीचे पैठण येथून प्रस्थान; छत्रपती संभाजीनगरात उद्या मुख्यमंत्र्यांची घेणार भेट
By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2023 06:10 PM2023-09-15T18:10:15+5:302023-09-15T18:10:43+5:30
छत्रपती संभाजीनगर येथे होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मराठा आरक्षणाच्या मागणीचे निवेदन देण्यात येणार
पैठण: मराठा समाजास सरसकट आरक्षण द्यावे या मागणीसाठी पैठण ते छत्रपती संभाजीनगर पायी आरक्षण दिंडीचे शुक्रवारी सकाळी ११ वा. येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून प्रस्थान झाले. हजारो समाज बांधव या दिंडीत सहभागी झाले होते. आरक्षण दिंडी शुक्रवारी बिडकीन येथे मुक्कामी थांबणार आहे.
दरम्यान, पैठण ते बिडकीन दरम्यान विविध गावातील ग्रामस्थ या दिंडीत सहभागी झाले. छत्रपती संभाजीनगर येथे होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मराठा आरक्षणाच्या मागणीचे निवेदन शनिवारी (दि. १६) रोजी देऊन पायी आरक्षण दिंडी परत फिरणार आहे. शुक्रवारी सकाळी पैठण येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकास अभिवादन करून मराठा मोर्चाच्यावतीने आरक्षण दिंडीचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येने महिला व मराठा समाज बांधव उपस्थित होते.
अंतरवाली सराटी येथील लाठिचार्जचा निषेध व मराठा आरक्षण लढ्यास पाठिंबा देण्यासाठी गेल्या सहा दिवसांपासून पैठण येथे मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने साखळी उपोषण सुरू आहे. या आंदोलनाचा दुसरा टप्पा म्हणून पैठण ते छत्रपती संभाजी नगर आरक्षण दिंडीचे आयोजन करण्यात आल्याचे मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले. आरक्षण दिंडीचे ठिकठिकाणी फटाके वाजवून गावकऱ्यांच्या वतीने स्वागत करण्यात आले. डोक्यावर मराठा आरक्षण असे लिहलेल्या टोप्या व हातात भगवा ध्वज घेऊन मराठा समाजातील युवक आरक्षण दिंडीत सहभागी झाले.
आरक्षण आमच्या हक्काचे, मराठा समाजास सरसकट आरक्षण द्या अशा घोषणा युवक देत होते. पैठण ते छत्रपती संभाजी नगर रस्त्याचे व जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू आहे. रिमझिम पाऊस झाल्याने रस्ता निसरडा झाला होता. आरक्षण दिंडीला यामुळे मार्गात अनेक अडथळे पार करावे लागले. आरक्षण दिंडीतील स्वयंसेवकांनी दिडीमुळे वाहतुकीस अडथळा येणार नाही याची काळजी घेतली. शुक्रवारी बिडकीन येथे आरक्षण दिंडीच्या भोजनाची व्यवस्था बिडकीन ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली. दरम्यान शनिवारी सकाळी दिंडी छत्रपती संभाजीनगर कडे रवाना होणार आहे.