वाहनांच्या वर्दळीनुसार सिग्नलच्या वेळा आपोआप कमी-जास्त होतील, १४ चौकांत स्मार्ट सिग्नल येणार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2024 08:07 PM2024-09-30T20:07:13+5:302024-09-30T20:10:37+5:30
महापालिका प्रशासन दोन कोटी रुपये खर्च करणार
छत्रपती संभाजीनगर : शहरात बहुतांश चौकातील सिग्नल बंद आहेत. काही ठिकाणी तर वाहनधारकांना सिग्नलच दिसत नाही. टायमर घड्याळी नाहीत. त्यामुळे मनपा प्रशासनाने १४ ठिकाणी अत्याधुनिक सिग्नल उभारण्याचा निर्णय घेतला आहे. नवीन सिग्नलमुळे वाहनधारकांचा वेळ, इंधनाची बचत होईल. त्याचप्रमाणे प्रदूषणही घटेल, असा दावा प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
वाहतूक पोलिसांनी मनपाकडे सिग्नल दुरुस्तीसाठी अनेक दिवसांपासून पाठपुरावा सुरू केला होता. वाहतूक पोलिसांना लागणारे साहित्य, सिग्नलची यंत्रणा उभारण्याचे दायित्व महापालिकेकडे आहे. यासंदर्भात प्रशासक जी. श्रीकांत, विद्युत विभागाच्या कार्यकारी अभियंता मोहिनी गायकवाड यांनी सांगितले की, गरवारे चौकात स्मार्ट सिग्नल सुरू केले आहे. या अत्याधुनिक सिग्नलचा वाहनधारकांना बराच फायदा होत आहे. याच पद्धतीचे शहरात अन्य सिग्नल उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. एका सिग्नलच्या उभारणीसाठी सुमारे १४ लाख रुपये खर्च येणार असल्याचे गायकवाड यांनी सांगितले.
नवीन सिग्नलचे फायदे
स्मार्ट सिग्नलमुळे वाहनधारकांचा वेळ वाचणार आहे. वाहनांच्या वर्दळीनुसार सिग्नलच्या वेळा आपोआप कमी-जास्त होतील. वाहन चालकांना दूरवरून सिग्नल दिसतील. सिग्नलवर थांबलेल्या वाहनांचे इंजिन बंद केले जात नाही. त्यामुळे प्रदूषणात वाढ होते. वाहनांच्या वर्दळीनुसार इंजिन बंद करावे लागेल. प्रदूषणातही घट होईल.
या चाैकात बसविणार सिग्नल
सिल्लेखाना, शरद टी पॉइंट, हॉटेल कार्तिकी चौक, धूत हॉस्पिटल चौक, रेल्वे स्टेशनसमोरील चौक, महानुभव आश्रम चौक, शहानूरमियाँ दर्गा चौक, समर्थनगर चौक, गजानन महाराज मंदिर चौक, केंब्रिज चौक, मुकुंदवाडी, टीव्ही सेंटर, भाई उद्धवराव पाटील चौक, सावरकर चौक.