जिल्हा नियंत्रण कक्षासह ९ रॅपिड रिस्पाॅन्स पथके तैनात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 04:06 AM2021-01-13T04:06:36+5:302021-01-13T04:06:36+5:30
औरंगाबाद : कोरोना महामारीच्या सुरुवातीलाच अपप्रचाराने पोल्ट्री व्यवसाय जमीनदोस्त झाला. गेल्या चार महिन्यांपासून काहीसा सावरत असताना देशातील पाच राज्यात ...
औरंगाबाद : कोरोना महामारीच्या सुरुवातीलाच अपप्रचाराने पोल्ट्री व्यवसाय जमीनदोस्त झाला. गेल्या चार महिन्यांपासून काहीसा सावरत असताना देशातील पाच राज्यात बर्ड फ्ल्यू ( विषाणू)ची साथ आल्याने महाराष्ट्रातही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. शेजारच्या जिल्ह्यांत कोंबड्या दगावल्याने कुक्कुट पालन करणारे पुन्हा धास्तावले आहेत. मात्र, जिल्ह्यात अद्याप एकही पक्षी दगावल्याचे आढळून आले नसून जिल्हा नियंत्रण कक्षासह नऊ तालुक्यांत रॅपिड रिस्पाॅन्स टीम पशुसंवर्धन विभागाने तैनात करत यंत्रणा सज्ज केली आहे.
लातूर व परभणी जिल्ह्यात काही ठिकाणी पक्षी दगावल्याच्या घटना समोर आल्या आहेत. मात्र, औरंगाबाद जिल्ह्यात अद्याप एकही पक्षी मृत्यूची घटना नोंद झालेली नाही. जिल्ह्यात पैठण व वैजापूर मोठे कुक्कुट पालनाचे व्यवसाय आहेत. जिल्ह्यात कोंबड्यांची संख्या सहा लाख ३३ हजार असून, अद्याप एकही कोंबडी दगावली नसल्याने घाबरण्याचे कारण नाही. मात्र, प्रत्येकाने दक्षता घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. उपाययोजनांसाठी लागणारे पीपीई किट व इतर साहित्य जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे मागणी केली आहे. आरआरटीच्या नऊ टीम आणि त्यांच्यावर संनियंत्रण कक्ष पशुधन उपायुक्त कार्यालयात निर्माण करण्यात आला आहे, असे डाॅ. माने यांनी सांगितले.
----
पशुसंवर्धन विभाग सज्ज
- रँडम पद्धतीने सर्व्हिलन्स आणि सर्वेक्षणासाठी सीरम, क्लोअकल, ट्रेकेअल सॅम्पल प्रत्येक तालुक्यातून घेऊन प्रयोगशाळेकडे पाठवण्यात आले.
- जायकवाडी परिसरात पक्ष्यांचे स्थलांतर मोठ्या प्रमाणात आहे. तिथे वनविभागालाही सतर्कतेचा इशारा दिला आहे.
- पक्ष्यांत काही आजार दिसून येत असल्यास त्याला अलग करावे. परिसर निर्जंतुकीकरण करणे. तसेच बर्ड फ्ल्यूमध्ये पक्षी पालकांनी घ्यावयाची काळजी, नागरिकांनी आहारात अंडी, मांस चांगले शिजवण्यासंदर्भात जनजागृती करण्यात येत आहे.
---
मृत पक्ष्याची माहिती लगेच कळवा
कुक्कुट पालनाच्या ठिकाणी अथवा परिसरात, शेतात, एखादा पक्षी मृत आढळून आल्यास, मृत्यू पावल्यास पशुवैद्यकीय विभागाला माहिती देणे गरजेचे आहे. पक्ष्याचे नमुने व बर्फामध्ये तो पक्षी भोपाळ किंवा पुण्यात तपासणीसाठी पाठवण्यात येईल. त्यातून त्या पक्ष्याच्या मृत्यूचे नमके कारण समजू शकेल. त्यामुळे मृत पक्ष्यांची माहिती देण्याचे आवाहन पशुसंवर्धन विभागाने केले आहे.
---
कोट
जिल्ह्यात अद्याप कावळा, कबुतर किंवा मोर अशा कुठल्याही पक्ष्याच्या मृत्यूची नोंद झालेली नाही. कुठेही पक्षी मृत्यू आढळून आल्यास पशुसंवर्धन विभागाला तत्काळ कळवा. त्याला हात लावू नये. डाॅक्टर त्या मृत पक्ष्याचे नमुने घेऊन तपासणीला पाठवतील. बर्ड फ्ल्यूचे आव्हान आल्यास पशुसंवर्धन विभाग सज्ज असून, दक्षतेबाबत आवाहन केले आहे.
-डाॅ. सुरेखा माने, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जिल्हा परिषद, औरंगाबाद