७0 उमेदवारांचे डिपॉझिट जप्त
By Admin | Published: October 22, 2014 01:25 PM2014-10-22T13:25:38+5:302014-10-22T13:25:38+5:30
विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात मोठा गाजावाजा करुन उतरलेल्या जिल्ह्यातील चार मतदारसंघामधील ८१उमेदवारांपैकी तब्बल ७0 उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले आहे.
परभणी: विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात मोठा गाजावाजा करुन उतरलेल्या जिल्ह्यातील चार मतदारसंघामधील ८१उमेदवारांपैकी तब्बल ७0 उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले आहे. या उमेदवारांना निवडणूक आयोगाने ठरवून दिलेल्या निकषानुसार मते मिळविता आले नाहीत. त्यामुळे त्यांच्यावर ही नाचक्की आली आहे.
परभणी विधानसभा मतदारसंघात तब्बल २५उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. या मतदारसंघात एकूण १लाख ९0 हजार २६७ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. निवडणूक आयोगाच्या अटीनुसार पहिल्या तीन क्रमांकावरील शिवसेनेचे डॉ. राहुल पाटील, एमआयएमचे सज्जुलाला व भाजपाचे आनंद भरोसे या तिघांचेच डिपॉझिट वाचले. उर्वरित काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, बसपासह तब्बल २२उमेदवारांचे २ लाख ५ हजार रुपयांचे डिपॉझिट अपेक्षित मते न मिळाल्याने जप्त करण्यात आले. तसे आदेश सोमवारी निवडणूक निर्णय अधिकारी सुभाष शिंदे यांनी काढले.
पाथरी विधानसभा मतदारसंघात २ लाख ३३ हजार ९६५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. या मतदारसंघात एकूण १८ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. त्यापैकी विजयी उमेदवार मोहन फड, दुसर्या क्रमांकावरील काँग्रेसचे सुरेश वरपूडकर आणि तिसर्या क्रमांकावरील राष्ट्रवादीचे बाबाजानी दुर्राणी या तिघांचेच डिपॉझिट वाचले आहे. उर्वरित उमेदवारांमध्ये शिवसेनेच्या मीराताई रेंगे, मनसेचे हरिभाऊ लहाने यांच्यासह १५ उमेदवारांचे १लाख ३0 हजार रुपयांचे डिपॉझिट जप्त करण्याचे आदेश निवडणूक निर्णय अधिकारी ब्रिजेश पाटील यांनी काढले.
जिंतूर विधानसभा मतदारसंघात एकूण २लाख ३९ हजार ६१९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. येथे १९उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. त्यापैकी विजयी उमेदवार विजय भांबळे आणि दुसर्या क्रमांकावरील काँग्रेसचे रामप्रसाद बोर्डीकर या दोघांचेच डिपॉझिट राहिले. उर्वरित १७ उमेदवारांचे १लाख ५६ हजार रुपयांचे डिपॉझिट निवडणूक निर्णय अधिकारी बोरगावकर यांनी जप्त केल्याचे आदेश काढले आहेत. डिपॉझिट जप्त झालेल्यांमध्ये शिवसेना, भाजपा, बसपा उमेदवारांचा समावेश आहे.
१६ उमेदवारांचे डिपॉजीट जप्त प्रमुख पक्षांवर नाचक्की
> निवडणूक आयोगाने ठरवून दिलेल्या निकषाएवढी मते मिळविण्यात अपयशी ठरल्याबद्दल जिल्ह्यातील चार विधानसभा मतदरासंघातील काँग्रेस, शिवसेना, मनसे, बसपा आदी प्रमुख पक्षांच्या उमेदवारांवर डिपॉझिट जप्त होण्याची नाचक्की आली.
> चार मतदारसंघातील ८१पैकी ७0 उमेदवारांचे एकूण ६ लाख २६ हजार रुपयांचे डिपॉझिट निवडणूक विभागाने जप्त केले आहे.
> अनेक दिग्गज उमेदवारांना डिपॉझिट वाचविता आले नसल्याने त्यांच्या व पक्षाच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
■ गंगाखेड विधानसभा मतदारसंघात २लाख ५४ हजार ८८५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. या मतदारसंघात एकूण १९ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. त्यापैकी पहिल्या तीन क्रमांकावरील उमेदवारांचे डिपॉझिट राहिले. त्यामध्ये विजयी उमेदवार मधुसूदन केंद्रे, दुसर्या क्रमांकावरील रासपचे रत्नाकर गुट्टे व तिसर्या क्रमांकावरील अपक्ष उमेदवार सीताराम घनदाट यांचा समावेश आहे. उर्वरित १६ उमेदवारांचे १ लाख ३५ हजार रुपयांचे डिपॉझिट जप्त करण्यात आले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी एस. एच. मावची यांनी दिली. डिपॉझिट जप्त झालेल्या उमेदवारांमध्ये शिवसेनेचे शिवाजी दळणर, काँग्रेसचे रविकांत चौधरी यांच्यासह मनसेचे बालाजी देसाई, बसपाचे शिवराज पैठणे आदी उमेदवारांचा समावेश आहे.