लोकप्रतिनिधींच्या उदासीनतेमुळे मराठवाड्यातील रेल्वे प्रश्न ‘जैसे थे’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2019 03:01 PM2019-11-15T15:01:52+5:302019-11-15T15:05:08+5:30

जालन्याचे खासदार तथा केंद्रीय राज्यमंत्री राहिले गैरहजर

Depression of people's representatives leads to railway question unsolved in Marathwada | लोकप्रतिनिधींच्या उदासीनतेमुळे मराठवाड्यातील रेल्वे प्रश्न ‘जैसे थे’

लोकप्रतिनिधींच्या उदासीनतेमुळे मराठवाड्यातील रेल्वे प्रश्न ‘जैसे थे’

googlenewsNext
ठळक मुद्दे रेल्वे बैठकीत फक्त चर्चेचे गुऱ्हाळ हे रेल्वे प्रश्न कधी सुटणार?

- संतोष हिरेमठ 

औरंगाबाद : मराठवाड्यातील वर्षानुवर्षे रेंगाळलेले रेल्वे प्रश्न सुटण्याच्या दृष्टीने नांदेड येथील दक्षिण मध्य रेल्वे आणि खासदारांच्या या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र, या बैठकीतून काहीही निष्पन्न झाले नाही. शिवाय केंद्रीय राज्यमंत्री असलेले खा. रावसाहेब दानवे बैठकीला गैरहजर राहिले. रेल्वे प्रशासनासह लोकप्रतिनिधीही रेल्वेप्रश्नी अशी उदासीनता दाखविणार असतील, तर मग मराठवाड्यातील रेल्वे प्रश्न कधी सुटणार, असा सवाल सर्वसामान्यांकडून उपस्थित होत आहे.

दक्षिण मध्य रेल्वेकडून नांदेड विभागाला कायम सापत्न वागणूक दिली जात असल्याची ओरड होते. मराठवाड्यातील रेल्वे प्रश्नांकडे, मागण्यांकडे सतत कानाडोळा करण्यात आला. मराठवाड्याच्या तोंडाला कायम पानेच पुसण्यात आली. त्यामुळेच नांदेड विभाग हा मध्य रेल्वेशी जोडण्याच्या मागणीने मध्यंतरी जोर धरला होता. परंतु मागणी मागे पडली आहे. दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागांतर्गत येणाºया खासदारांची १३ नोव्हेंबरला नांदेड येथे विभागीय रेल्वे कार्यालयात बैठक झाली. मराठवाड्यातील रेल्वे विकास वर्षानुवर्षे खुंटला आहे. नव्या रेल्वेगाड्या, दुहेरीकरण, पीटलाईनसह अनेक गोष्टींसाठी केवळ प्रतीक्षा करावी लागत आहे. या बैठकीतून काही तरी पदरी पडेल, अशी अपेक्षा होती. रेल्वे बोर्डाने मनमाड-औरंगाबाद-परभणी-नांदेड-मुदखेड रेल्वे विद्युतीकरणासाठी मागील अर्थसंकल्पात मंजुरी दिली होती. मात्र, हाती घेण्यात आलेल्या विद्युतीकरणाच्या कामात या मार्गाला पूर्णपणे डावलले. बैठकीच्या माध्यमातून औरंगाबादला पीटलाईन, परभणी-मनमाड रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण, विद्युतीकरण, दौलताबाद-चाळीसगाव रेल्वे मार्ग, औरंगाबादच्या मॉडेल रेल्वेस्टेशनचा दुसरा टप्पा, पीटलाईन, मुकुंदवाडी रेल्वेस्टेशनवर एक्स्प्रेसला थांबा आदी प्रश्न मार्गी लागण्याची अपेक्षा होती. 

रेल्वेकडून दरवर्षी बैठक घेतली जाते. परंतु त्यातून रेल्वे प्रश्न सुटले, असे कधी झाले नाही. किमान ही बैठक तरी त्याला अपवाद ठरेल. किमान विभाग, संपूर्ण झोनच्या अंतर्गत आणि अधिकारातील समस्या निकाली निघतील, अशी रेल्वे संघटनांना आशा होती. त्यामुळेच गतवर्षीच्या बैठकीतील कोणते प्रश्न मार्गी लागले, असा सवालही उपस्थित करून खासदारांनी के ला.  मात्र, दरवर्षीप्रमाणे ही बैठकीही फक्त चर्चेचे गुºहाळ करणारी ठरली. खासदारांनी मांडलेले प्रश्न सोडविण्यासाठी दमरे प्रयत्नशील राहील, असे उत्तर देऊन रेल्वे अधिकारी मोकळे झाले. त्यामुळे मराठवाड्यातील प्रवाशांना त्यातून काहीही मिळाले नाही. 

परभणी-मनमाड रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण, मुंबईसाठी नवीन रेल्वे यासह अनेक प्रश्न रेल्वे बोर्डाकडे अडकले आहेत. हे प्रश्न सुटण्याच्या दृष्टीने केंद्र सरकार, रेल्वे बोर्ड आणि रेल्वे प्रशासनाकडे पाठपुरावा आणि हे प्रश्न मार्गी लागावे, यासाठी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे मराठवाड्यातील जनता आशाळभूत नजरेने पाहते आहे. मात्र, नांदेड येथील बैठकीला ते गैरहजर राहिले. त्यामुळे मराठवाडा किंवा जालना येथे रेल्वेचे कोणतेही प्रश्न नाहीत का, जे बैठकीत मांडणे गरजेचे होते, असा प्रश्न उपस्थित होत आहे. रेल्वेच्या बैठकीला ते गैरहजर राहिले. औरंगाबादेत हर्सूल येथील एका अनाथ दत्तक क न्येच्या विवाह समारंभाला त्यांची उपस्थिती होती. सामाजिकदृष्ट्या हा विवाह समारंभ महत्त्वपूर्ण आहे. परंतु रेल्वेच्या अपुºया सुविधांनी त्रस्त असलेल्या मराठवाड्यातील जनतेसाठी रेल्वेची बैठक महत्त्वाची होती. 

हे रेल्वे प्रश्न कधी सुटणार?
मनमाड ते परभणी विद्युतीकरणासह दुहेरीकरणाचे काम सुरू करणे.
रोटेगाव-कोपरगाव हा ३५ कि. मी. चा नवीन रेल्वे मार्ग बनविणे.
औरंगाबाद - दौलताबाद - चाळीसगाव या  ८८ कि.मी.च्या नव्या मार्गाचे काम लवकर सुरू होणे.
औरंगाबाद रेल्वेस्टेशनवर पीटलाईन बनविण्यात यावी.
मुंबईसाठी नवीन रेल्वे, राज्यराणी एक्स्प्रेसचा विस्तार.
औरंगाबादच्या मॉडेल रेल्वेस्टेशनच्या दुसºया टप्प्याचे काम.

Web Title: Depression of people's representatives leads to railway question unsolved in Marathwada

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.