लॉकडाऊन काळात परराज्यातील श्रमिकांसाठी सेवा देऊनही चालक प्रोत्साहन भत्त्यापासून वंचित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2021 01:42 PM2021-03-16T13:42:12+5:302021-03-16T13:51:49+5:30
कोरोना विषाणू संसर्गाच्या काळात 'लॉकडाऊन'मध्ये शासकीय कर्मचारी, वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचारी, इतर अत्यावश्यक सेवांतील कर्मचारी यांची ने-आण करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन भत्ता देण्याचा निर्णय घेण्यात आला.
औरंगाबाद : कोरोना विषाणूमुळे गतवर्षी लॉकडाऊन काळात श्रमिकांसाठी ‘एसटी’ने मदतीचा हात देऊन विविध राज्यांच्या सीमांवर सोडण्याचे काम केले. पण हे काम ज्यांच्या जोरावर केले, त्या चालकांनाच प्रोत्साहन भत्त्यापासून डावलण्यात आले. या प्रोत्साहन भत्त्याची चालकांना दहा महिन्यांपासून नुसती प्रतीक्षा करावी लागत आहे.
कोरोना विषाणू संसर्गाच्या काळात 'लॉकडाऊन'मध्ये शासकीय कर्मचारी, वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचारी, इतर अत्यावश्यक सेवांतील कर्मचारी यांची ने-आण करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन भत्ता देण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयाचे एसटीच्या कर्मचाऱ्यांनी स्वागत केले. 'लॉकडाऊन'च्या काळात औरंगाबादसह विविध भागांतून अनेक एसटी बसमधून परराज्यात जाणाऱ्या हजारो श्रमिकांना विविध राज्यांच्या सीमांपर्यंत पाठविण्याचे काम एसटी कर्मचाऱ्यांनी केले आहे. या एसटी कर्मचाऱ्यांनाही त्यांच्या कामासाठी ३०० रुपये प्रतिदिन प्रोत्साहन देण्यात यावे, अशी मागणी एसटी कर्मचाऱ्यांची केली. पण परराज्यातील श्रमिकांसाठी सोडण्यात आलेल्या चालकांना या भत्त्यापासून वंचित ठेवण्यात आले. औरंगाबादतून ३९३ बसद्वारे सुमारे ८ हजार ७२९ प्रवाशांना आपापल्या राज्यात पाठविले आहे, अशी माहिती विभागीय वाहतूक अधिकारी अमोल अहिरे यांनी दिली.
लवकर प्रोत्साहन भत्ता द्यावा
प्रोत्साहन भत्ता कागदोपत्रीच आहे. कोरोनाच्या त्या काळात चालकांनी दोन-दिवसाचा प्रवास उपाशी राहून मजुरांना गावी साेडले. रस्त्यात पाण्याची सुविधा नव्हती. अशा परिस्थितीत सेवा दिली. ‘त्या’ चालकांना लवकरात लवकर प्रोत्साहन भत्ता दिला पाहिजे.
- अशोक पवार पाटील,मराठवाडा अध्यक्ष, मनसे राज्य परिवहन कामगार सेना
सकारात्मक कारवाई केली जाईल
परराज्यातील मजुरांना औरंगाबाद जिल्ह्यातून एसटी बसने राज्याच्या सीमेपर्यंत सोडण्यात आले. मध्यवर्ती कार्यालयात प्रोत्साहन भत्त्यासंदर्भात निर्णय होईल. मध्यवर्ती कार्यालयाकडून जो काही निर्णय होईल, त्यानुसार सकारात्मक कारवाई केली जाईल.
- बाळकृष्ण चंदनशिवे, विभागीय कर्मचारी वर्ग अधिकारी, एसटी महामंडळ
कोरोनाकाळात आपल्या जिल्ह्यातून परराज्यात एसटीच्या फेऱ्या झाल्या-३९३
चालकांनी दिली कोरोनाकाळात सेवा- ३९३
परराज्यातील श्रमिकांना पोहोचविले- ८ हजार ७२९