'हवेत कोण आहे, हे त्यांनीच तपासावे'; देवेंद्र फडणवीस यांचा शरद पवारांवर पलटवार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2023 07:45 AM2023-01-09T07:45:10+5:302023-01-09T07:45:18+5:30
शरद पवार यांनी कोल्हापूरमध्ये पत्रकार परिषदेमध्ये, सत्तेत असलेले लोक हवेत असल्यासारखे वागत असल्याची टीका राज्य सरकारवर केली होती.
औरंगाबाद : आमचा संपर्क जमिनीवरील लोकांशी आहे. आम्हाला आमची जमीन माहिती आहे. आम्ही जमिनीवरच चालतो. त्यामुळे नेमके हवेत कोण आहे, हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा.शरद पवार यांनीच तपासावे, असे प्रत्युत्तर उपमुख्यमंत्री देेवेंद्र फडणवीस यांनी रविवारी औरंगाबाद येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना दिले.
पवार यांनी कोल्हापूरमध्ये पत्रकार परिषदेमध्ये, सत्तेत असलेले लोक हवेत असल्यासारखे वागत असल्याची टीका राज्य सरकारवर केली. पवारांच्या त्या विधानाबाबत उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले. मसिआ उद्योग संघटनेच्या औद्योगिक प्रदर्शनाच्या समारोप समारंभासाठी फडणवीस औरंगाबादेत आले असता, त्यांना विमानतळावर पत्रकारांनी गाठले. राज्यातील सत्ताधारी हवेत असल्याची टीका विरोधकांनी केली आहे, सत्ताधारी खरेच हवेत आहेत काय, असा सवाल पत्रकारांनी केल्यानंतर फडणवीस म्हणाले, ‘आमची जमीन आम्हाला माहिती असून, आमचा संपर्क येथील लाेकांशी आहे. त्यामुळे नेमके हवेत कोण आहे, हे पवारांनी जरूर तपासावे.’
सीमावादाबाबत सरकार गंभीर
सीमावादाबाबत राज्य सरकार गंभीर आहे. ज्येष्ठ विधिज्ञ हरिश साळवे यांच्याशी सरकारने संपर्क केला असून, ते सरकारच्या बाजूने उभे राहतील, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला. यावेळी सहकारमंत्री अतुल सावे, आ.नारायण कुचे, प्रवीण घुगे, राजू शिंदे आदींची उपस्थिती होती.