पोलीस उपायुक्त पथकातील कर्मचारी लाच घेताना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 04:05 AM2021-09-25T04:05:12+5:302021-09-25T04:05:12+5:30
औरंगाबाद : वाळूचा हायवा सुरळीत सुरू ठेवण्यासाठी व्यापाऱ्याकडून दरमहा सात हजारांची लाच घेणाऱ्या पोलीस उपायुक्त झोन-२ च्या पथकातील कर्मचारी ...
औरंगाबाद : वाळूचा हायवा सुरळीत सुरू ठेवण्यासाठी व्यापाऱ्याकडून दरमहा सात हजारांची लाच घेणाऱ्या पोलीस उपायुक्त झोन-२ च्या पथकातील कर्मचारी विनायक लक्ष्मण गिते याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने कांचनवाडीत सापळा रचून अटक केली. विशेष म्हणजे लाच घेणारा गिते हा पुंडलिकनगर ठाण्यातील कर्मचारी असून, त्याला एक वर्षापूर्वीच उपायुक्तांच्या पथकात संलग्नित करण्यात आले होते.
पुंडलिकनगर पोलीस ठाण्यातील गिते (३३) हा एक वर्षापासून पोलीस उपायुक्त झोन-२ च्या पथकात कार्यरत आहे. शेंदुरवादा येथील वाळूचा व्यापाऱ्यास शहरात वाळू विक्री करायची असल्याने तो गिते याला भेटला. वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी त्याने दरमहा सात हजार रुपये लाचेची मागणी केली. लाच देण्याची इच्छा नसल्याने व्यापाऱ्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक राहुल खाडे यांच्याकडे तक्रार नोंदवली. तक्रारीवरून पोलीस निरीक्षक नंदकिशोर क्षीरसागर यांनी तक्रारीची शहानिशा केली असता तक्रारीत तथ्य आढळले. यावरून पोलीस निरीक्षक अनिता इटुबुने, नंदकिशोर क्षीरसागर, हवालदार राजेंद्र जोशी, बाळासाहेब राठोड, भूषण देसाई, चंद्रकांत शिंदे यांच्या पथकाने शुक्रवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास कांचनवाडीतील एका हॉस्पिटलसमोर सापळा रचून गितेला सात हजारांची लाच घेताना अटक केली. पोलीस उपायुक्तांच्या पथकातील कर्मचारी लाचेत अडकल्याने पोलिसांत खळबळ उडाली आहे. याप्रकरणी सातारा ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, गिते हा वाळू व्यावसायिकांकडून ‘कलेक्शन’ करीत असल्याची चर्चा एसीबीच्या कार्यालयात होती.