पोलीस उपायुक्त श्रीरामे यांची खंडपीठात धाव; एफआयआर रद्द करण्याची केली विनंती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2018 08:04 PM2018-07-03T20:04:35+5:302018-07-03T20:07:15+5:30
या याचिकेवर बुधवारी (दि.४ जुलै) न्या. एस.एस. शिंदे आणि न्या. व्ही.के. जाधव यांच्या खंडपीठात प्राथमिक सुनावणी होणार आहे.
औरंगाबाद : बलात्काराचा आरोप असलेले पोलीस उपायुक्त राहुल श्रीरामे यांनी त्यांच्याविरुद्ध लैंगिक अत्याचाराबाबत दाखल झालेला प्रथम माहिती अहवाल (एफआयआर-गुन्हा) रद्द करण्याची विनंती करणारी फौजदारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल केली आहे. या याचिकेवर बुधवारी (दि.४ जुलै) न्या. एस.एस. शिंदे आणि न्या. व्ही.के. जाधव यांच्या खंडपीठात प्राथमिक सुनावणी होणार आहे.
एका तरुणीने २२ जून २०१८ रोजी पोलीस आयुक्तालयाच्या तक्रार निवारण केंद्राच्या ‘व्हॉटस्अॅप’नंबरवर श्रीरामे यांच्याविरुद्ध लैंगिक अत्याचाराची तक्रार दिली होती. त्याअनुषंगाने २७ जून रोजी एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात श्रीरामे यांच्याविरुद्ध भा.दं.वि. कलम ३७६ नुसार गुन्हा (क्रमांक १५४/१८) दाखल झाला आहे. हा प्रथम माहिती अहवाल (गुन्हा) रद्द करण्याची विनंती करणारी फौजदारी याचिका श्रीरामे यांनी अॅड. अभिषेक कुलकर्णी यांच्यामार्फत दाखल केली आहे.
( उपायुक्त राहुल श्रीरामे यांचा कसूर अहवाल गृहविभागाकडे पाठविण्यात येईल; पोलीस आयुक्तांची माहिती )