देशीदारू दुकान हटवा आंदोलन तीव्र; अनाड ग्रामपंचायतच्या व्हरांड्यात भरली शाळा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2023 06:36 PM2023-10-21T18:36:10+5:302023-10-21T18:37:36+5:30
देशी दारू दुकान इतरत्र हलविण्यात येत नाही तो पर्यंत विद्यार्थ्यांचा शाळेवर बहिष्कार....
सिल्लोड: तालुक्यातील अनाड येथील ७५ ते८० विद्यार्थीनी शाळेत जाण्यावर बहिष्कार टाकला असून शनिवारी सकाळी अनाड ग्रामपंचायत कार्यालयाच्या व्हरांड्यात त्यांनी स्वतः ची शाळा भरवली. यामुळे आता देशी दारूचे दुकान हटवा आंदोलन गावात तीव्र झाले असून प्रशासनाची कोंडी झाली आहे.
जिल्हाधिकारी व उत्पादन शुल्क विभाग यांनी परवानगी देऊन अजिंठा गावातील देशी दारूचे दुकान अजिंठा - अनाड रस्त्यावर मागील आठवड्यात स्थलांतरित केली.अनाड रस्त्यावर सुरू झालेल्या दारू दुकानाला अनाड ग्रामस्थ आणि येथील शाळेतील विद्यार्थीनींनी विरोध दर्शविला आहे. जोपर्यंत दारू दुकान हलविण्यात येत नाही तोपर्यंत अनाड गावातील विद्यार्थी अजिंठा येथे शिक्षणासाठी शाळेत जाणार नाही, ते बहिष्कार टाकतील असा निर्णय, अनाड ग्रामस्थांनी घेतला. यानुसार गावात ग्रामपंचायतच्या व्हरांड्यात शाळा भरवण्यात आली.येथे विद्यार्थी स्वतः अभ्यास करतील अशी माहिती संदीप मानकर यांनी दिली.
अहवाल शासनाला पाठविणार
दारू दुकान हटविण्याबाबत वाद वाढल्याने उत्पादन शुल्क इन्स्पेक्टर डहाके यांनी अनाड ग्रामस्थांची भेट घेऊन जवाब घेतले, त्यानंतर एक अहवाल शासनाला पाठविणार असल्याचे सांगितले. मात्र ग्रामस्थांचा त्यात समाधान झालं नाही व त्यांनी दारू दुकान हलविण्याची आग्रही मागणी आहे. जोपर्यंत दुकान हटत नाही तोपर्यंत विद्यार्थी शाळेत जाणार नाही असा निर्णय घेतला.
याप्रसंगी अनाड गांवचे माजी सरपंच आत्माराम मुके, माजी पोलीस पाटील भास्करसिंग पवार, अजबसिंग जाधव, माजी ग्रा.पं.सदस्य बाबासाहेब गोंडे, विद्यमान उपसरपंच प्रवीण जाधव, ग्रा.पं.सदस्य भागवत शिंदे, ग्रा.पं.सदस्य गजानन गदाई, ग्रा.पं.सदस्य संदीप मानकर, ग्रा.पं. सदस्य निलेश पवार, गजानन खंडाळकर सहित नागरिक मोठ्या संख्येने हजर होते.