देशमुख, पुजरवाड मित्रमंडळ विजयी
By Admin | Published: March 15, 2016 12:53 AM2016-03-15T00:53:15+5:302016-03-15T01:02:34+5:30
नांदेड : जिल्हा परिषद कर्मचारी पतसंस्थेच्या निवडणुकीत अविनाश देशमुख, बाबूराव पुजरवाड मित्र मंडळ पॅनलच्या १५ उमेदवारांनी एकतर्फी विजय प्राप्त करून
नांदेड : जिल्हा परिषद कर्मचारी पतसंस्थेच्या निवडणुकीत अविनाश देशमुख, बाबूराव पुजरवाड मित्र मंडळ पॅनलच्या १५ उमेदवारांनी एकतर्फी विजय प्राप्त करून पतसंस्थेवर निर्विवाद वर्चस्व प्राप्त केले़ एऩ डी़ कदम, सतीश कावडे यांच्या पॅनलचा एकही उमेदवार निवडून आला नाही़ पतसंस्थेची मतमोजणी ३ वाजता संपल्यानंतर साडेतीन वाजता निकाल जाहीर झाला़ त्यानंतर देशमुख, पुजरवाड मित्रमंडळाच्या उमेदवारांनी विजयी मिरवणूक काढली़
शहरातील सर्वात मोठी व वार्षिक २० कोटींची आर्थिक उलाढाल असलेल्या कर्मचारी पतसंस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीकडे सर्वांचेच लक्ष लागले होते़ दोन्ही पॅनलच्या प्रमुखांनी विजयासाठी सर्वस्तरावर प्रयत्न चालविले होते़ अखेर अविनाश देशमुख व बाबूराव पुजरवाड यांच्या नेतृत्वाखालील पॅनलच्या पंधरा उमेदवारांना मतदारांनी कौल देत पंतसंस्था त्यांच्या ताब्यात दिली़ त्यामुळे पुन्हा एकदा अविनाश देशमुख यांच्या नेतृत्वाला मतदारांनी पसंती दर्शविली़ आरोग्य विभागाच्या पतसंस्थेवर विजय मिळविल्यानंतर अविनाश देशमुख यांनी कर्मचारी पतसंस्थेवरही आपला प्रभाव कायम ठेवला़ तर दुसरीकडे कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर वेळोवेळी आंदोलने करणारे बाबूराव पुजरवाड यांच्याबद्दल असलेली सहानुभूती या निवडणुकीत कारणीभूत ठरली़ जि़ प़ मुख्यालयासह तालुकास्तरावरही मित्रमंडळाने प्रचारात आघाडी घेत चुरस निर्माण केली होती़
१३ मार्च रोजी मतदान झाल्यानंतर या निवडणुकीच्या निकालाची प्रतीक्षा सर्वांनाच होती़ सोमवारी सकाळी १० वाजता कौठा येथील शिवाजी पतसंस्थेत मतमोजणी सुरू झाल्यानंतर दुपारी ३ वाजेपर्यंत सर्वांचे निकाल हाती आले़ तेव्हा देशमुख, पुजरवाड मित्रमंडळाचे सर्वच्या सर्व उमेदवार बहुमतांनी विजयी झाले़ त्यानंतर सर्व उमेदवारांची शहरातून वाजत - गाजत मिरवणूक काढण्यात आली़ जिल्हा परिषद इमारतीसमोर उमेदवारांनी एकच जल्लोष करीत विजयाचा आनंद व्यक्त केला़ निर्वाचण अधिकारी घुले यांनी काम पाहिले़ यासंदर्भात पॅनलचे प्रमुख अविनाश देशमुख म्हणाले, हा विजय सर्व सभासदांचा आहे़ ही पतसंस्था साडेसोळाशे सदस्यांची असून पराभूत झालेले उमेदवारसुद्धा आमचेच मित्र आहेत़ ही पतसंस्था त्यांचीही आहे़ निवडणुकीदरम्यान दोन्ही पॅनलच्या प्रचार सभेतून एकमेकांवर टीका करण्यात आली़ मात्र हा विषय निवडणुकीपुरताच होता़ यापुढे कोणालाही त्रास होणार नाही, याची दक्षता घेण्यात येईल़
बाबूराव पुजरवाड म्हणाले, पतसंस्था भ्रष्टाचारमुक्त करण्यासाठी आम्ही सर्व कटिबद्ध आहोत़ हा विजय सर्वांचा आहे़ प्रारंभापासूनच आमच्या पॅनलला मतदारांनी पसंती दर्शवली होती़ त्यामुळे विजय निश्चित होता़ (प्रतिनिधी)
सर्वसाधारण मतदार संघ - तुळशीराम कृष्णुरे- ५४५, खाजा मोहीयोद्दीन मो़युसूफोद्दीन- ५६१, माधवसिंह चौहाण - ५८५, अशोक पावडे - ५८६, बाबूराव पुजरवाड- ६५४, अविनाश मेडपलवार- ५८६, मधुकर मोरे- ६०७, संजय शितळे -५९१, अमृतराव शिंदे - ६०९, शेख चाँद शेख महमंद - ५८७़
महिला मतदारसंघ - छाया कांबळे - ६२१, निर्मला वाठोरे - ६३४, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग - अनिल चव्हाण - ६१८,
इतर मागासर्गीय - रत्नाकर सातव - ६७८,
अनुसूचित जाती, जमाती - नागेश सिंदगीकर - ५९६