आजारी पडले तरी, आता ‘नो टेन्शन’, मिनी घाटीत २४ तास डाॅक्टर कामावर
By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2022 06:45 PM2022-04-27T18:45:43+5:302022-04-27T18:45:59+5:30
प्रत्येक डाॅक्टर ‘ऑन काॅल’, अत्यावश्यकप्रसंगी रुग्णालयात धाव
- संतोष हिरेमठ
औरंगाबाद : उन्हाळा म्हटला की, सुट्या आणि कुटुंबासह पर्यटन, देवदर्शन, मुलांचा मामाच्या गावाला दौरा असेच समीकरण पाहायला मिळते. प्रत्येकजण किमान काही दिवस सुट्या घेतात. परंतु काहीजण असे आहेत की, ते २४ तास कर्तव्यावर असतात, ते म्हणजे डाॅक्टर. मिनी घाटी म्हणजे जिल्हा सामान्य रुग्णालयातील केवळ २ डाॅक्टरांनी मे महिन्यात सुटी घेतली आहे. त्यामुळे आजारी पडले तरी ‘डाॅक्टर नाहीत, ते सुटीवर आहेत’ असे कोणीही म्हणणार नाहीत.
घाटीपाठोपाठ चिकलठाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालय गोरगरीब रुग्णांसाठी आधारवड ठरत आहे. याठिकाणी रोजची ओपीडी आता दीड हजारांवर गेली आहे. त्याबरोबर प्रसूतींची संख्या वाढत आहे. अनेक गुंतागुंतीचे उपचार येथील डाॅक्टरांनी यशस्वीरित्या दिले आहेत. त्यामुळे रुग्णालयावर डाॅक्टरांचा विश्वास वाढत आहे.
आकडेवारी काय सांगते ?
जिल्हा रुग्णालयातील डाॅक्टर-४३
इतर स्टाफ- १७३
सुटीसाठी करावा लागतो अर्ज
जिल्हा रुग्णालयातील डाॅक्टरांपासून ते कर्मचाऱ्यांपर्यंत सर्वांना सुटीसाठी अर्ज करावा लागतो. आजघडीला २ डाॅक्टरांनी मे महिन्यात अर्जित रजा घेतली आहे. २९ दिवसांसाठी ते सुटीवर आहेत. परंतु गरज पडली, तर त्यांना रुग्णसेवेसाठी बोलावले जाईल. इतर कर्मचारी एक ते दोन दिवसांसाठी सुटी घेण्यासाठी अर्ज करतात.
कामावरील डाॅक्टर २४ तास दक्ष
जिल्हा रुग्णालयातील डाॅक्टरांना २४ रुग्णांसाठी दक्ष राहावे लागते. कामाचे ८ ते १२ तास झाले आणि काम संपले, असे डाॅक्टरांच्याबाबतीत होत नाही. डाॅक्टर हे ऑन काॅल असतात. ओपीडीनंतर सर्जरी, प्रसूती आदींसाठी त्यांना कधीही रुग्णालयात परत यावे लागते.
जिल्हा रुग्णालयात या होतात शस्त्रक्रिया
जिल्हा रुग्णालयात सिझेरियन प्रसूती, कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया, कानाच्या काही मायनर आणि मेजर शस्त्रक्रिया, हाड मोडणे, पायातील राॅड काढण्याच्या शस्त्रक्रियेसह इतर अनेक शस्त्रक्रिया होतात. डाॅक्टर सुटीवर असले, तरी शस्त्रक्रियांवर कोणताही परिणाम होत नसल्याचे सांगण्यात आले.
रुग्णसेवेसाठी तत्पर
जिल्हा रुग्णालयात डाॅक्टरांवर कोणत्याहीप्रकारे कामाचा ताण नाही. मे महिन्यात केवळ २ डाॅक्टर सुटीवर आहेत. ज्या दिवशी रुग्णालयातील संपूर्ण खाटा भरलेल्या असतील, तेव्हा ताण येईल. डाॅक्टरांना रुग्णांसाठी कधीही रुग्णालयात यावे लागते.
- डाॅ. पद्मजा सराफ, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक