साखरेचा चांगला भाव असूनही कारखाने देत आहेत ऊसाला कमी भाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2017 04:27 PM2017-07-22T16:27:30+5:302017-07-22T16:28:08+5:30
साखरेचा दर 4 हजार असतांना उसाला मात्र अर्धाच भाव मिळाल्याने शेतक-यांमध्ये कारखान्याच्या विरोधात संतापाचे वातावरण आहे.
बीड/माजलगाव : सन 2016-17 चा गाळप हंगाम सुरु होतांना इतर कारखान्यांच्या तुलनते जास्त भाव देण्याच्या वल्गना करणा-या तालुक्यातील दोन्ही सहकरी साखर कारखान्यांनी एफ.आर.पी. पेक्षा जास्त दर दिल्याचा कांगावा करीत इतर कारखान्यांपेक्षा प्रतिटन 600 रुपये कमी भाव देऊन शेतक-यांच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार केला असुन साखरेचा दर 4 हजार असतांना उसाला मात्र अर्धाच भाव मिळाल्याने शेतक-यांमध्ये कारखान्याच्या विरोधात संतापाचे वातावरण आहे.
माजलगांव तालुक्यात सलग तिन वर्षे दुष्काळाची परिस्थिती असतांनाही गेल्या वर्षीच्या हंगामात तालुक्यातील तिन कारखान्यांनी जवळपास 3 लाख मेट्रीक टन उसाचे गाळप केले. गाळप हंगाम सुरु होण्यापूर्वी प्रत्येक कारखान्याकडुन इतर कारखान्यांच्या तुलनेत आम्ही जास्त भाव देवू अशी वल्गना करुन शेतक-यांना आकर्षीत करण्याचे काम केले. मोठया अपेक्षेने शेतक-यांनी या कारखान्यांना आपला उस दिला. वास्तविक उसाचे प्रमाण अत्यंत कमी असल्यामुळे उस ओढण्यासाठी कारखान्यांमध्ये चांगलीच स्पर्धा पहावयास मिळाली मात्र ज्यावेळी प्रत्यक्ष दर देण्याची वेळ आली त्यावेळी या कारखान्यांनी वेगवेगळी कारणे सांगत कमी दरात शेतक-यांची बोळवण केली.
दोन वर्षांपूर्वी आपल्या पहिल्या वर्षीच्या गाळपातच छत्रपतीला साजेसा भाव दिला जाईल अशी वल्गना करणा-या सावरगांव येथील छत्रपती सहकारी साखर कारखान्याने 2 हजार रुपयांप्रमाणे शेतक-यांना पैसे दिले तर तेलगांव येथील लोकनेते सुंदरराव सोळंके सह. साखर कारखान्याने देखील 2 हजार प्रमाणेच भाव दिला मात्र खाजगी तत्वावर चालणा-या पवारवाडी येथील जय महेश शुगरने शेतक-यांना 2 हजार 600 रुपयांप्रमाणे भाव पहिल्याच हप्त्यात दिला. त्या तुलनेत सहकारी तत्वावरील दोन्ही कारखान्यांनी शेतक-यांच्या तोंडाला पाने पुसत चांगलाच मलिदा मिळविला.
शेतक-यांचे जवळपास 10 कोटी रुपयांचे नुकसान
गेल्या हंगामात सुंदरराव सोळंके कारखान्याने 89 हजार मे.टन., छत्रपती 71 हजार 82 मे.टन तर जय महेशने 1 लाख 31 हजार 500 मे.टन उसाचे गाळप केले सहकारी कारखान्यांनी शेतक-यांना दिलेल्या भावामुळे शेतक-यांचे जवळपास 10 कोटी रुपयांचे नुकसान झालेले आहे.
मागील पाच सहा महिन्यांपासुन साखरेचा भाव हा गगनाला भिडलेला असुन तो 3 हजार 500 ते 4 हजार इतका आहे. साखरेला एवढा भाव असतांना देखील त्याच्या अर्धाच भाव शेतक-यांना मिळतो आहे यात कारखाने मोठया प्रमाणावर फायद्यात आहेत मात्र मागील काळातील तुट भरुन काढण्याच्या नावाखाली कारखाने शेतक-यांची लुट करीत आहेत.
भाव वाढवण्याच्या विचारात
कारखान्याने या वर्षी एफ.आर.पी. पेक्षा जास्त भाव दिलेला आहे असे असतांनाही आणखीन भाव वाढवुन देण्याचे कारखाना प्रशासनाच्या विचाराधीन आहे.
- एम.डी. घोरपडे, व्यवस्थापकीय संचालक, सुंदरराव सोळंके सह.साखर कारखाना
जास्त भाव दिला आहे
आमचा नविन कारखाना असुन आम्हाला बायप्रोडक्टच्या माध्यमातुन कसलेही इतर उत्पन्न मिळत नाही तरी देखील कारखान्याने एफ.आर.पी. पेक्षा 219 रुपयांनी भाव जास्त दिलेला आहे.
- आर.एस. शिंदे, व्यवस्थापकीय संचालक, छत्रपती सहकारी साखर कारखाना