भीती वाटत असल्याने यादीत नाव असूनही लसीकरणासाठी पुढे येण्याचे धाडस होईना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 04:02 AM2021-01-25T04:02:01+5:302021-01-25T04:02:01+5:30
औरंगाबाद : कोरोना लसीकरणाला १६ जानेवारी रोजी मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. पहिल्या दिवशी आनंदाने कोरोना योद्धा आरोग्य कर्मचाऱ्यांनी लस ...
औरंगाबाद : कोरोना लसीकरणाला १६ जानेवारी रोजी मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. पहिल्या दिवशी आनंदाने कोरोना योद्धा आरोग्य कर्मचाऱ्यांनी लस घेतली. पण लसीकरणाच्या दुसऱ्याच दिवशी लसीकरणाचे प्रमाण घसरले. कारण रिॲक्शनची भीती. लसीवर विश्वास असल्याचे सांगितले जाते. पण लसीकरण टाळण्यासाठी इतर अनेक कारणेही पुढे केली जात आहेत. परिणामी आतापर्यंत ५५ टक्के आरोग्य कर्मचाऱ्यांनीच लसीचा डोस घेतला आहे.
कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाच्या पहिल्या दिवशी जेवढे प्रमाण होते, त्यातुलनेत दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी त्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात घसरले. जिल्ह्यात रोज १० केंद्रांवर प्रत्येकी १०० या प्रमाणे एक हजार आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. परंतु लसीकरणाच्या ४ दिवसांत आतापर्यंत केवळ २ हजार २०६ जणांनीच डोस घेतला आहे. तब्बल एक हजार ७९४ जणांनी विविध कारणे पुढे करून डोस घेणे टाळले आहे. परंतु लसीकरणाच्या चौथ्या दिवशी म्हणजे २२ जानेवारी रोजी लसीकरणाच्या प्रमाणात वाढ झाली. कारण या दिवशी आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लस घेत कर्मचाऱ्यामधील भीती दूर होण्यासाठी एक पाऊल पुढे टाकले. या दिवशी लसीकरणाने उच्चांक गाठला. त्यामुळे आगामी काही दिवासांतही लसीकरणाचे प्रमाण वाढण्याची आशा व्यक्त होत आहे.
रिॲक्शन काय?
लस घेतल्यानंतर काही आरोग्य कर्मचाऱ्यांना लस घेतल्याच्या जागेत खाज, थंडीताप, अंग-डोकेदुखी , मळमळ-उलटी आणि जेवणाची इच्छा न होणे या पाच प्रमुख तक्रारींना सामोरे जावे लागले. सौम्य स्वरूपात ताप येणे हे एकप्रकारे सकारात्मक रिॲक्शन असते, असे आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले.
---
लस घेण्यासाठी येऊ लागल्या अडचणी
लस घेण्यासाठी मला संदेश मिळाला. पण लसीकरणाच्या पहिल्या दिवशी लस घेणाऱ्या काहींना रिॲक्शन झाल्याचे कळले. त्यामुळे थोडी भीती वाटली. पण लवकरच मी लस घेणार आहे.
-लाभार्थी आरोग्य कर्मचारी
-----
लस घेण्यासाठी वेळ मिळाली होती. पण त्याच वेळी माझी ड्यूटीपण सुरू होती. वेळ काढून जाऊन येऊ, असे ठरवले होते. पण कामाच्या व्यापात लसीकरणाला जायचे राहून गेले.
- लाभार्थी आरोग्य कर्मचारी, घाटी
-----
आज ना उद्या लस घ्यावी लागणार आहे. पण दिलेल्या वेळेतच लस घेतली पाहिजे, असे वाटत नाही. लस सुरक्षित आहे, यावर विश्वास आहे. मी काम करत असलेल्या रुग्णालातच लस दिली जात आहे.
-लाभार्थी आरोग्य कर्मचारी
----
लस घेणे हा ऐच्छिक निर्णय आहे. माझी प्रकृती चांगली आहे. कोरोना काळात अगदी सुरक्षितपणे रुग्णसेवा दिली. लस कधी घ्यायची, याचा निर्णय लवकरच घेणार आहे.
- लाभार्थी आरोग्य कर्मचारी
----
लसीकरणासाठी ऐनवेळी मला सांगण्यात आले. आता ऐनवेळी लस घेण्याची तयारी कशी करता येणार. त्यामुळे लस घेता आली नाही. राहिलेल्या लाेकांना लस दिली जाणार आहेच.
-लाभार्थी आरोग्य कर्मचारी
----
१००० जणांना रोज लसीकरणासाठी बोलावले जाते.
२२०६ जणांना आतापर्यंत लस दिली
४००० जणांना लस देणे अपेक्षित होते.
--
आधी लसीकरणाचे प्रमाण कमी राहिले, पण शुक्रवारी माझ्यासह वरिष्ठ आरोग्य अधिकाऱ्यांनी लस घेतली. या दिवशी लसीकरणाचे प्रमाण वाढल्याचे पहायाला मिळाले. रिॲक्शनची भीती कोणामध्येही नाही. यापुढे लसीकरणाचे प्रमाण वाढत जाणार, असा विश्वास आहे.
- डॉ. सुंदर कुलकर्णी, जिल्हा शल्यचिकित्सक