सत्ता असूनही कामे होत नाहीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2019 12:25 AM2019-07-11T00:25:51+5:302019-07-11T00:26:31+5:30
महापालिकेत शिवसेने- भाजपची सत्ता आहे. मात्र वॉर्डांमध्ये मागील एक ते दीड वर्षापासून विकासकामे होत नसल्याचे चित्र आहे. कोट्यवधी रुपयांच्या विकासकामांच्या वर्क आॅर्डर झालेल्या आहेत मात्र बिल न मिळण्याच्या शंकेने कंत्राटदार काम करायलाच तयार नाहीत.
औरंगाबाद : महापालिकेत शिवसेने- भाजपची सत्ता आहे. मात्र वॉर्डांमध्ये मागील एक ते दीड वर्षापासून विकासकामे होत नसल्याचे चित्र आहे. कोट्यवधी रुपयांच्या विकासकामांच्या वर्क आॅर्डर झालेल्या आहेत मात्र बिल न मिळण्याच्या शंकेने कंत्राटदार काम करायलाच तयार नाहीत. प्रत्येक वॉर्डाच्या किमान १ कोटी रुपयांची कामे निविदा प्रक्रियेत आहेत. ठप्प विकासकामांमुळे येणाऱ्या विधानसभा आणि मनपा निवडणुकीस कोणत्या तोंडाने मतदारांसमोर जाणार, असा प्रश्न नगरसेवकांकडून उपस्थित करण्यात येत आहे.
शिवसेनेच्या माजी उपमहापौर स्मिता घोगरे यांनी सोमवारी चक्क एमआयएमचे खा. इम्तियाज जलील यांच्याकडे जलवाहिनीसाठी निधीची मागणी केली. महापालिका जलवाहिनी टाकण्यास मंजुरी देत नसल्याने त्यांनी पक्षभेद बाजूला ठेवून एमआयएमकडे निधीची मागणी केली. आता एमआयएम सेना नगरसेविकेच्या वॉर्डात निधी देईल का, हेसुद्धा पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
महापालिकेतील नगरसेवकांवर चक्कविरोधी पक्षाकडे निधी मागण्याची वेळ का आली, याचा कानोसा घेण्याचा प्रयत्न बुधवारी ‘लोकमत’ने केला. फक्त सेना नगरसेवकांच्या वॉर्डांचा आढावा घेतला असता अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या. महापालिकेत शिवसेना भाजपची सत्ता असली तरी याचा किंचितही फायदा नगरसेवकांना आणि पर्यायाने जनतेला होताना दिसत नाही. एक ते दीड वर्षापासून सेना नगरसेवकांच्या वॉर्डात विकासाचे एकही काम झालेले नाही. सेनेच्या नगरसेवकांप्रमाणेच सत्तेत भागीदार असलेल्या भाजपा नगरसेवकांची अवस्था आहे. विकासकामांसाठी मागील दोन ते तीन वर्षांमध्ये कोट्यवधी रुपयांचा निधी मिळाला. प्रत्यक्षात जेव्हा काम करण्याची वेळ आली तेव्हा महापालिकेची तिजोरी रिकामी झाली. २३० कोटी रुपयांची बिले थकल्यामुळे एकही कंत्राटदार काम करण्यास तयार नाही. वर्क आॅर्डर झालेली कामेही खुशाल रद्द करा, असे कंत्राटदारांचे म्हणणे आहे. यामुळे नगरसेवकांमध्ये मात्र अस्वस्थता आहे.
सेना नगरसेवकांच्या वॉर्डांची अवस्था
मयूरनगर वॉर्ड क्र. ९- नगरसेविका- स्वाती नागरे
४ कोटी रुपयांची कामे मंजूर आहेत. त्यातील ३ कोटी रुपयांच्या कामांची वर्क आॅर्डरही झालेली आहे. १ कोटी रुपयांची कामे सध्या निविदा प्रक्रियेत प्रलंबित आहेत. मागील एक वर्षापासून वॉर्डात एकही नवीन काम झालेले नाही.
वेदांतनगर वॉर्ड क्र. १०३- नगसेवक- विकास जैन
वर्क आॅर्डर झालेली किमान १ कोटीची कामे प्रलंबित आहेत. २ कोटी रुपयांची कामे अद्याप निविदा प्रक्रियेत अडकली आहेत. मागील एक वर्षात कोणतेही विकासकाम झालेले नाही.
शिवनेरी कॉलनी वॉर्ड क्र. ३१- नगरसेविका- ज्योती पिंजरकर
वर्क आॅर्डर झालेली किमान दीड कोटी रुपयांची कामे अद्याप सुरू करणे बाकी आहे. अडीच कोटी रुपयांची विकासकामे निविदा प्रक्रियेत रखडली आहेत. १८ महिन्यांपासून वॉर्डात विकासकामे ठप्प.
स्वामी विवेकानंदनगर वॉर्ड क्र. २८- नगरसेविका- सीमा खरात
वर्क आॅर्डर झालेली १ कोटी १ लाख रुपयांची कामे आहेत. २ कोटी ६२ लाख रुपयांची विकासकामे निविदा प्रक्रियेत आहेत. वारंवार निविदा प्रसिद्ध केल्यानंतरही कंत्राटदार निविदा प्रक्रियेकडे बघण्यास तयार नाहीत.
सुरेवाडी वॉर्ड क्र. ८- नगरसेवक- सीताराम सुरे
वर्क आॅर्डर झालेली तब्बल ३ कोटी रुपयांची कामे आहेत. निविदा प्रक्रियेत १ कोटी १० लाख रुपयांची कामे आहेत. १८ ते १९ महिन्यांपासून एकही नवीन विकासकाम वॉर्डात नाही.
एकतानगर वॉर्ड क्र. ३- नगरसेवक- रूपचंद वाघमारे- अपक्ष- (सेना समर्थक)
वर्क आॅर्डर झालेली २ कोटी ५० लाख रुपयांची कामे बाकी आहेत. २ कोटी ५० लाख रुपयांची कामे अद्याप निविदा प्रक्रियेत आहेत. मागील काही महिन्यांपासून एकही नवीन काम वॉर्डात झालेले नाही.