शिष्यवृत्तीसाठी खबरदारी घेतली तरीदेखील दोनशे कामगार पाल्यांचे खाते मिसिंग!
By साहेबराव हिवराळे | Published: April 22, 2023 07:48 PM2023-04-22T19:48:11+5:302023-04-22T19:48:29+5:30
कामगार कल्याण मंडळाचे अधिकारी शोधताहेत ‘खाते’ सोशल मीडियाचा घेतला आधार!
छत्रपती संभाजीनगर : कामगार कल्याण मंडळाच्या वतीने कामगार तसेच त्यांच्या पाल्यांसाठी विविध कल्याणकारी उपक्रम राबविले जातात. पाठ्यपुस्तके तसेच देश व परदेशातील शैक्षणिक शिष्यवृत्तीही त्याचाच भाग आहे. त्यासाठी पात्र पाल्यांच्या शैक्षणिक शिष्यवृत्तीसाठी जवळपास साडेपाच हजार अर्ज भरून घेण्यात आले. खबरदारी घेतली, तरीदेखील दोनशे कामगार पाल्यांचे खाते मिसिंग झाले आहेत. आता कामगार कल्याण मंडळाचे अधिकारी ‘खाते’ सोशल मीडियाच्या मदतीने शोध घेत आहेत.
साडेपाच हजारपैकी २०० नॉट रिचेबल...
कामगार कल्याण मंडळात अर्ज दाखल करताना विद्यार्थी तसेच पालकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. त्यांनी शिष्यवृत्तीसाठीचे अर्ज हे खासगी सेवा केंद्रामार्फत मंडळाला दाखल केले आहेत. त्यांनी त्या अर्जांची पडताळणी करून ते पुढे पाठविल्याचे सांगितले असले तरी विद्यार्थ्याच्या खात्यात अद्याप काहीही जमा झालेले नाही. ज्यांच्याकडे मोबाइलच नाही, त्यांचे स्वत:चे किंवा वडिलांचे जनधन खाते असेल काय, याचा शोध अधिकारी घेत आहेत.
कामगार पाल्यांच्या शिष्यवृत्ती अर्जात त्रुटी...
शैक्षणिक सत्र संपत आले असून, छत्रपती संभाजीनगर विभागात अनेक त्रुटी आढळून आल्या. अजून किती दिवस प्रतीक्षा करावी, असा सवाल पालकांनी उपस्थित केला आहे. यंदा पडताळणी करून अर्ज स्वीकारले आहेत, मग कामगार पाल्यांपैकी दोनशे पाल्य अद्याप शिष्यवृत्तीच्या प्रतीक्षेत कसे राहिले, असा प्रश्न उपस्थित होतो आहे.
उच्च शिक्षितांच्या खात्यातही शिष्यवृत्ती...
मंडळाने यंदा अत्यंत गतिमान काम केलेले आहे. पाठ्यपुस्तक व इतर साहित्य देण्यात आले असून, शिष्यवृत्तीचा निधीही बँक खात्यात टाकण्यात आला. परंतु, ज्या दोनशे कामगार पाल्यांना अद्याप शिष्यवृत्ती मिळाली नाही, त्यांनी त्यांच्या खाते नंबरसह नजीकच्या कामगार मंडळ किंवा ललित कला भवनात वरिष्ठांशी संपर्क साधावा. पात्र ठरलेल्या पाल्यांच्या खात्यात शिष्यवृत्ती पाठविणार आहोत.
-मनोज पाटील, सहायक कल्याण आयुक्त, कामगार कल्याण मंडळ