मुख्यमंत्र्यांच्या शब्दानंतरही ‘सुपर स्पेशालिटी’च्या खासगीकरणावर शिक्कामोर्तब
By संतोष हिरेमठ | Published: September 22, 2023 06:11 PM2023-09-22T18:11:33+5:302023-09-22T18:11:52+5:30
केवळ ५० टक्के बेड शासकीय योजनेतील रुग्णांसाठी राखीव : आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थेसोबत राहणार १५ वर्षांपर्यंत भागीदारी
छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यातील गोरगरीब रुग्णांचा आधारवड असलेल्या घाटीतील सुपर स्पेशालिटी रुग्णालयाच्या खासगीकरणावर अखेर शिक्कामोर्तब झाले आहे. मुंबईत झालेल्या बैठकीत सुपर स्पेशालिटी रुग्णालयाचे परिचालन, व्यवस्थापन शासन आणि खासगी भागीदारी तत्त्वावर करण्याचा निर्णय घेण्यात आला. तब्बल १५ वर्षांसाठी आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थेसोबत भागीदारी राहणार आहे. खासगीकरण होणार नाही, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केल्यानंतरही हा निर्णय घेण्यात आला. याचा फटका गोरगरीब रुग्णांना बसणार आहे. त्यामुळे संपूर्ण मराठवाड्यातून संताप व्यक्त होत आहे.
मंत्रालयात छत्रपती संभाजीनगर, लातूर आणि नागपूर येथील सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सार्वजनिक-खासगी भागीदारी तत्त्वावर चालविण्यासंदर्भात बैठक घेण्यात आली. यावेळी वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह वैद्यकीय शिक्षण विभागाचे अधिकारी आणि आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थेचे प्रतिनिधी उपस्थित होते. छत्रपती संभाजीनगर आणि लातूर येथे रुग्णालयाची इमारत तयार आहे. याठिकाणी रुग्णांना उपचारासोबत अत्याधुनिक निदान सेवा मिळणार आहे. या दोन्ही ठिकाणी इमारत आणि वैद्यकीय सामग्री शासन पुरविणार आहे. दोन्ही रुग्णालये खासगी तत्त्वावर सुरू होणार असले तरी खासगी रुग्णालयाप्रमाणे शुल्क येथे स्वीकारले जाणार नाही. जनआरोग्यासाठीच्या ५० टक्के खाटा पूर्ण झाल्या तरी येणाऱ्या रुग्णांवर उपचार केले जाणार आहेत. ही भागीदारी १५ वर्षांपर्यंत आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थेसोबत राहणार असल्याचे बैठकीत सांगण्यात आले.
वैद्यकीय शिक्षणमंत्री दिलेला शब्द विसरले
मंत्रिमंडळाच्या बैठकीनिमित्त १६ सप्टेंबरला शहरात आल्यानंतर घाटीत आढावा बैठकीप्रसंगी वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी सुपर स्पेशालिटी हाॅस्पिटलच्या खासगीकरणाचा विचार नाही. माझ्यापर्यंत हा विषय आलेलाच नाही, असे ते म्हणाले होते; परंतु त्यानंतर अवघ्या ५ दिवसांत खासगीकरणावर शिक्कामोर्तब करण्यात आले. अभ्यागत समितीच्या बैठकीतील ठरावालाही केराची टोपली दाखविण्यात आली.
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडे जाऊ, पण खासगीकरण होऊ देणार नाही- आ. प्रदीप जैस्वाल
सुपर स्पेशालिटी रुग्णालयाचे खासगीकरण होऊ देणार नाही. मराठवाड्यासह लगतच्या जिल्ह्यातील सर्वसामान्य रुग्ण घाटीत येतात. त्यांचे हाल होऊ देणार नाही. खासगीकरणाचा हा प्रस्ताव रद्द करण्यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडे जाऊ. कोणत्याही परिस्थितीत खासगीकरण होऊ देणार नाही, असे अभ्यागत समितीचे अध्यक्ष आणि आ. प्रदीप जैस्वाल म्हणाले.
खासगीकरण हाणून पाडू
नागरिकांनी हे सरकार निवडले आहे, ते सरकारी संस्था चालविण्यासाठी, विकण्यासाठी नाही. घाटीत ११ जिल्ह्यांतील गोरगरीब रुग्ण येतात. खासगीकरणाला आमचा विरोध आहे आणि हे खासगीकरण हाणून पाडू.
- ॲड. अभय टाकसाळ, शहर सचिव, भारतीय कम्युनिस्ट पक्ष
सर्व राजकीय नेते काही पाऊल उचलतील का?
सुपर स्पेशालिटी रुग्णालयाला केवळ ७५ नर्सिंग स्टाफ पाहिजे, त्यानंतर ते रुग्णालय घाटीला चालविता येईल, असे न्यायालयात सांगण्यात आले होते. नर्सिंग स्टाफ देण्याची प्रक्रिया सुरू असताना खासगी भागीदारी तत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. याला माझा विरोध आहे, पण सर्व राजकीय पक्षांचे नेते गोरगरीब रुग्णांसाठी पाऊल उचलणार का, असा प्रश्न आहे.
- खा. इम्तियाज जलील