अखेर नियतीने साधला डाव; एका हॉस्पिटलने नाकारले; दुसरीकडे उपचार करताना प्रयत्नांची पराकाष्ठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2020 01:01 PM2020-06-16T13:01:11+5:302020-06-16T13:08:15+5:30
. नेमके काय झाले, याची विचारणा ‘लोकमत’ प्रतिनिधीने तणावात असलेल्या नातेवाईकांकडे केली, तेव्हा व्हेंटिलेटर नसल्याने याठिकाणी दाखल केले जात नाही, आम्ही दुसऱ्या रुग्णालयात जात असल्याचे त्यांनी सांगितले.
- संतोष हिरेमठ
औरंगाबाद : वेळ सोमवारी दुपारी १२ वाजेची. स्थळ एमजीएम रुग्णालय. एक रिक्षा इमर्जन्सी विभागासमोर येऊन थांबते. रिक्षात आॅक्सिजन सिलिंडरसह एक वृद्ध अत्यवस्थ अवस्थेत. तरीही रिक्षातच तपासणी केल्यानंतर व्हेंटिलेटर उपलब्ध नसल्याचे कारण सांगून सरळ माघारी पाठवले जाते. नातेवाईक कसेबसे दुसरे रुग्णालय गाठतात. याठिकाणीही अडचण होती. ‘लोकमत’ने मदतीचा हात दिला आणि रुग्ण दाखल झाला. उपचार सुरु झाले. रुग्णाला वाचविण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करण्यात आली. मात्र, रुग्णाचा मृत्यू झाल्याची माहिती रात्री रुग्णालयाकडून देण्यात आली.
शाहगंज येथील ६८ वर्षीय वृद्धाला श्वास घेण्यास त्रास होत होता. या रुग्णाला एमजीएम रुग्णालयाने उपचारासाठी नकार दिल्यानंतर त्याला मुकुंदवाडीतील सेठ नंदलाल धूत हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. अस्थमा असलेल्या या रुग्णाला गेल्या तीन-चार दिवसांपासून श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने कुटुंबियांनी खाजगी डॉक्टरांच्या मदतीने त्याला घरीच आॅक्सिजन लावला होता. अनेक वेळा घरी असे आॅक्सिजन लावल्यानंतर प्रकृती सुधारत असल्याचे नातेवाईकांनी सांगितले.
सोमवारी त्रास अधिक वाढल्याने कुटुंबियांनी सिलिंडरसह त्यांना घेऊन दुपारी १२ वाजता एमजीएम रुग्णालयात गाठले. रिक्षा एमजीएम रुग्णालयाच्या इमर्जन्सी विभागासमोर येऊन थांबते. याठिकाणी पीपीई कीट घातलेले डॉक्टर रिक्षातच रुग्णाच्या शरीरातील आॅक्सिजनचे प्रमाण पाहतात. जवळपास ५ मिनिटांनंतर त्यांना इमर्जन्सी विभागापासून काही अंतरावर असलेल्या कोविड-१९ ओपीडीकडे जाण्यास सांगितले जाते. त्यासाठी एक कर्मचारी रस्ताही दाखवितो. कोविड-१९ ओपीडीसमोर रिक्षा थांबवली जाते. याठिकाणीही रुग्णाला रिक्षातच ठेवले जाते. ढगाळ वातावरणामुळे चांगलाच उकाडा जाणवत होता. त्याचा रुग्णालाही प्रचंड त्रास होत होता. रुग्णाची अवस्था नातेवाईकांना पाहवत नव्हती. नातेवाईक पेपरच्या मदतीने रुग्णाला हवा घालत होते. याठिकाणी तपासणी केल्यानंतर १५ मिनिटांनंतर रुग्णाला घेऊन नातेवाईक रुग्णालयातून बाहेर पडण्यासाठी निघतात. हा सगळा प्रकार ‘लोकमत’चे प्रतिनिधी कॅमेऱ्यात टिपत होते. नेमके काय झाले, याची विचारणा ‘लोकमत’ प्रतिनिधीने तणावात असलेल्या नातेवाईकांकडे केली, तेव्हा व्हेंटिलेटर नसल्याने याठिकाणी दाखल केले जात नाही, आम्ही दुसऱ्या रुग्णालयात जात असल्याचे त्यांनी सांगितले.
रिक्षा एमजीएम रुग्णालयातून बाहेर पडली, तसे ‘लोकमत’चे प्रतिनिधी आणि छायाचित्रकारही त्यांच्या मागे धावले. साधारण दुपारी १२.४० वाजता रिक्षा सेठ नंदलाल धूत हॉस्पिटलमध्ये पोहोचली. याठिकाणी रुग्णाला डॉक्टरांनी तपासले. आयसीयू बेड शिल्लक नसल्याचे येथील डॉक्टरांकडूनही सांगण्यात येते. त्यामुळे नातेवाईक येथूनही बाहेर पडण्याच्या मार्गावर होते; परंतु ‘लोकमत’ प्रतिनिधीने हा प्रकार धूत हॉस्पिटलचे प्रशासक डॉ. हिमांशू गुप्ता यांच्या निदर्शनास आणून दिला. तेव्हा नातेवाईकांनी संमतीपत्र भरून दिले तर जनरल वॉर्डात रुग्णावर उपचार करण्याची तयारी त्यांनी दाखवली. याविषयी कल्पना देताच नातेवाईकांनी संमतीपत्र भरून देण्यास होकार दिला आणि अखेर रुग्ण रुग्णालयात दाखल झाला. दुपारपासून वृद्धावर उपचार सुरू करण्यात आले. सायंकाळी रुग्णाची प्रकृती बिघडली आणि त्याचा मृत्यू झाल्याचे नातेवाईक आणि रुग्णालयातर्फे कळविण्यात आले.
रुग्णांना नाकारणाऱ्या रुग्णालयांना ‘आयएमए’ देणार नोटीस
जागा असूनही रुग्णांना नकार देणाऱ्या रुग्णालयांना नोटीस दिली जाईल, अशी माहिती इंडियन मेडिकल असोसिएशनचे (आयएमए) अध्यक्ष डॉ. संतोष रंजलकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. शहरातील अनेक खाजगी रुग्णालयांचे दरवाजे गंभीर रुग्णांसाठी बंदच आहेत. गंभीर रुग्ण येताच त्यांना सरळ बाहेरचा रस्ता दाखविला जात आहे. यातून रुग्णांचा जीवही धोक्यात येत आहे. तरीही रुग्णांना नकार देणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई करण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. याविषयी ‘आयएमए’ची भूमिका जाणून घेण्यात आली. याविषयी डॉ. रंजलकर म्हणाले, कोरोनाचे उपचार काही मोजक्या रुग्णालयांमध्ये उपलब्ध आहेत. त्यामुळे रुग्णांना रेफर केले जाते. जागा उपलब्ध असूनही रुग्णास नकार दिला जात असेल, तर रुग्णालयास नोटीस दिली जाईल. रुग्णांना नाकारण्यात येऊ नये, अशी सूचना रुग्णालयांना केली जाईल, असे ते म्हणाले.
१५ टक्के डॉक्टर हे ५५ वर्षांवरील
शहरात १५ टक्के डॉक्टर हे ५५ वर्षांवरील आहेत, तर २० टक्के रुग्णालयांमध्ये एका डॉक्टरद्वारे सेवा दिली जाते. यात काही ठिकाणी रुग्णसेवा देण्यास अनेक कारणांमुळे अडचणी येत असल्याचेही डॉ. संतोष रंजलकर यांनी सांगितले. च्शहरात एका डॉक्टरद्वारे रुग्णसेवा दिल्या जाणाऱ्या रुग्णालयांना कर्मचाऱ्यांच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. कोरोनाचे रुग्ण सापडल्यानंतर वसाहतीतून ये-जा करता येत नाही. त्यामुळे कर्मचारी रुग्णालयात येऊ शकत नाहीत. त्याचाही रुग्णसेवेवर परिणाम होत आहे, असेही त्यांनी सांगितले.
सेंट्रल रेफरल सिस्टीमची गरज
आयसीयू बेड खाली नसताना रुग्णाला दाखल करून घेतले.आयसीयू बेड रिक्त नसेल तर इतर ठिकाणी जावे लागेल याची नातेवाईकांना कल्पना दिली होती. त्यामुळे ते परत जात होते; परंतु नंतर त्यांनी होकार दिला. सुरुवातीला जनरल वॉर्डात आवश्यक ती सुविधा दिली आणि नंतर आयसीयू बेड रिक्त झाल्यानंतर त्याला तिथे भरती केले. मनपाने सेंट्रल रेफरल सिस्टीम केली पाहिजे. - डॉ. हिमांशू गुप्ता, प्रशासक, धूत हॉस्पिटल
व्हेंटिलेटर उपलब्ध नसल्याचे सांगितले असेल
व्हेंटिलेटर नसल्याचे सांगितले असेल; परंतु उपचार नाकारले जात नाहीत. दाखल करून घेतले जाईल; पण व्हेंटिलेटरची गरज लागली तर उपलब्ध नाही, हे सांगितले जाते. नातेवाईकांना रुग्णास अन्य कुठे घेऊन जायचे असेल तर आम्ही थांबवू शकत नाही. रुग्णाच्या तपासणीविषयी माहिती घेतली जाईल. - डॉ. प्रवीण सूर्यवंशी, उपअधिष्ठाता, एमजीएम वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय