घरफोड्या, पिस्टल चोरीचा पोलिसांना उलगडा होईना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2018 12:07 AM2018-04-15T00:07:26+5:302018-04-15T00:08:51+5:30
बन्सीलालनगर आणि पहाडसिंगपुरा येथील बंद घरे फोडून चोरट्यांनी लाखो रुपयांचा ऐवज लंपास केला. पोलीस कॉन्स्टेबलच्या कॅमरेच्या पिस्टलसह दहा गोळ्या चोरट्यांनी लांबविल्या. या घटनांना दोन महिन्यांपेक्षा अधिक कालावधी होऊ गेला आहे. दहा दिवसांपूर्वी सेव्हन हिल येथील एटीएमवर गोळ्या झाडून रोकड लुटण्याचा प्रयत्न झाला. शहरात झालेल्या या गंभीर गुन्ह्यांचा उलगडा होत नसल्याने चोरट्यांचे फावत असल्याचे समोर आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : बन्सीलालनगर आणि पहाडसिंगपुरा येथील बंद घरे फोडून चोरट्यांनी लाखो रुपयांचा ऐवज लंपास केला. पोलीस कॉन्स्टेबलच्या कॅमरेच्या पिस्टलसह दहा गोळ्या चोरट्यांनी लांबविल्या. या घटनांना दोन महिन्यांपेक्षा अधिक कालावधी होऊ गेला आहे. दहा दिवसांपूर्वी सेव्हन हिल येथील एटीएमवर गोळ्या झाडून रोकड लुटण्याचा प्रयत्न झाला. शहरात झालेल्या या गंभीर गुन्ह्यांचा उलगडा होत नसल्याने चोरट्यांचे फावत असल्याचे समोर आले.
रेल्वेस्टेशन परिसरातील बन्सीलालनगर, द्वारकापुरीमधील रहिवासी प्रा.राहुल प्रदीप अग्रवाल यांच्या बंद बंगल्याच्या खिडकीचे गज कापून चोरट्यांनी १४ तोळे सोन्याचे दागिने, सव्वाकिलो चांदीचे ताट, वाटी आणि रोख १ लाख २५ हजार रुपये, असा सुमारे साडेपाच ते सहा लाखांचा ऐवज लंपास केला. ही घटना १२ फेब्रुवारी रोजी दुपारी उघडकीस आली. याप्रकरणी वेदांतनगर ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.
दुसरी घटना बीड बायपास रोड परिसरातील रहिवासी राजेंद्र शेषराव गायकवाड (४७) हे १० मार्च रोजी दुपारी सव्वादोन वाजेच्या सुमारास सहपरिवार बाहेर गेले होते. चोरट्यांनी ही संधी साधून घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला व कपाटात ठेवलेले सुमारे दीड लाखांचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केली. भारतभ्र्रमणासाठी गेलेल्या निवृत्त वृद्ध दाम्पत्याचा पहाडसिंगपुरा येथील बंगला फोडून चोरट्यांनी ३० तोळ्याचे सोन्याचे दागिने, २ किलो चांदी आणि रोख ७ हजार रुपये, असा सुमारे दहा लाखांचा ऐवज चोरून नेला. ही घटना २१ फेब्रुवारी रोजी रात्री उघडकीस आली. याप्रकरणी बेगमपुरा ठाण्यात गुन्हा नोंद आहे.
फेबु्रुवारी महिन्यात या मोठ्या चोऱ्या झाल्या. घटना घडल्यानंतर गुन्हे शाखेचे अधिकारी, कर्मचाºयांसह पोलीस ठाण्यातील तपास तरबेज अधिकाºयांनी घटनास्थळाला भेट देऊन पंचनामाही केला. श्वानपथक, ठसे तज्ज्ञांचीही मदत घेण्याचे सोपस्कारही पार पाडण्यात आले. त्यानंतर मात्र या गुन्ह्यांच्या तपासाचे काय झाले, असे अधिकाºयांना विचारल्यानंतर तपास सुरू आहे, एवढेच उत्तर त्यांच्याकडून मिळते. मात्र तपासात काय प्रगती झाली, ते सांगत नाहीत.
पोलिसांचे पिस्टल न सापडणे ही शोकांतिकाच
मद्यधुंद पोलीस कर्मचाºयाच्या कमरेचे पिस्टल आणि दहा गोळ्या चोरीला जाण्याच्या घटनेला तीन महिने पूर्ण होत आहेत. पिस्टल सांभाळताना दिरंगाई केल्याप्रकरणी पोलीस आयुक्तांनी तडकाफडकी पोलीस कॉन्स्टेबल अमित स्वामी यांना खात्यातून बडतर्फ केले. मात्र चोरीला गेलेल्या पिस्टलचा तपास लावण्यात पोलीस अधिकारी कमी पडतात, ही एक शोकांतिकाच आहे.
एवढेच नव्हे तर सेव्हन हिल येथील एटीएम सेंटरवर पिस्टलमधून गोळ्या झाडण्यात आल्या त्या नऊ एमएमच्या होत्या. यावरून चोरीला गेलेल्या पिस्टलचाच यात वापर झाला असावा, असा पोलिसांना संशय आहे. मात्र गोळ्या झाडण्याचे धाडस करून एटीएम लुटण्याचा प्रयत्न करणारा घटनेच्या दहाव्या दिवशीही मोकाट आहे.
जिन्सीतील खुनाचा तपास फाईल बंद
जुना मोंढा परिसरातील एका विहिरीजवळ खून करून पोत्यात गुंडाळून फेकण्यात आल्याचे समोर आल्यानंतर जिन्सी ठाण्यात अज्ञातांविरोधात गुन्हा नोंद आहे. गतवर्षी झालेला हा खून कोणी आणि का केला, याबाबतचे कोडे सोडविण्यात पोलिसांना यश आले नाही. परिणामी गुन्हे शाखेने या हत्येच्या तपासाची फाईल बंद करण्याचा निर्णय घेतल्याचे सूत्रांनी सांगितले.