औरंगाबादेत घरफोड्यांचा तपास ठप्प; खुनाचे आरोपीही सापडेनात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2018 03:43 PM2018-10-02T15:43:11+5:302018-10-02T15:44:19+5:30

गेल्या काही महिन्यांपासून शहरातील विविध ठिकाणी झालेल्या घरफोडीच्या पाच मोठ्या घटना घडल्या आहेत.

Detention of house burglary in Aurangabad; The murderer also not found | औरंगाबादेत घरफोड्यांचा तपास ठप्प; खुनाचे आरोपीही सापडेनात

औरंगाबादेत घरफोड्यांचा तपास ठप्प; खुनाचे आरोपीही सापडेनात

googlenewsNext

औरंगाबाद : गेल्या काही महिन्यांपासून शहरातील विविध ठिकाणी झालेल्या घरफोडीच्या पाच मोठ्या घटना घडल्या आहेत. या घटनांचा छडा लावण्यात पोलीस यंत्रणा कमी पडत असल्याने चोरट्यांचे धाडस वाढत असल्याचे दिसून येते.  यासोबतच आठ दिवसांपूर्वी पत्नीचा खून करून पसार झालेला आणि अन्य एका खुनाच्या घटनेतील आरोपी पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत.

पदमपुरा येथील नवयुग कॉलनीत राहणारे कापड दुकानदार रमण रांदड यांचे घर भरदिवसा चोरट्यांनी फोडले. या घटनेत १४ तोळ्याचे दागिने आणि १ लाख २० हजारांची रोकड चोरट्यांनी पळविली. ही घटना ३० जून रोजी घडली. याप्रकरणी वेदांतनगर ठाण्यात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंद आहे, तर अशाच दुसऱ्या घटनेत १ सप्टेंबर रोजी हमालवाडा येथील अमृतसाई अपार्टमेंटमधील रो हाऊस फोडून चोरट्यांनी २२ तोळ्याचे दागिने चोरून नेले होते. या घटनेची नोंद सातारा ठाण्यात करण्यात आली.  दोन्ही घटनांपूर्वी पदमपुरा येथील एका प्राध्यापकाचे घर फोडून चोरट्यांनी किमती ऐवज लंपास केला होता. 

पहाडसिंगपुरा येथील एका निवृत्त नर्सचे घर फोडून चोरट्यांनी सुमारे दहा लाखांचे दागिने लंपास केले होते. या घटनांचा अद्याप उलगडा करण्यात शहर पोलिसांना यश आले नाही. असे असताना बन्सीलालनगर येथील महेश अग्रवाल यांचे बंद घर फोडून चोरट्यांनी सुमारे सव्वापाच लाखांचा ऐवज लंपास केला. या घटनेनंतर चार दिवसांनी उल्कानगरी येथील मनीष वाखारकर यांचे बंद घर भरदिवसा चोरट्यांनी फोडले. वाखारकर यांच्या घरातून चोरट्यांनी साडेसात तोळ्याचे दागिने चोरून नेले. या घटनेप्रकरणी जवाहरनगर ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. 

बन्सीलालनगरात चोरटे आले कारमधून
बन्सीलालनगर येथील अग्रवाल यांचे घर फोडण्यासाठी चोरटे कारने आले होते, अशी माहिती समोर आली. यावरून चोरटे हायटेक झाल्याचे सूत्रांनी सांगितले. विशेष म्हणजे गतवर्षी गुन्हे शाखेने पकडलेली खिडकी गँगही चोऱ्या करण्यासाठी कारचा वापर करीत होती.

पत्नीचा मारेकरी सापडेना
चारित्र्याच्या संशयावरून परिचारिका पत्नीचा भोसकून खून केल्यानंतर पसार झालेल्या भाऊसाहेब शिंदेचा अद्याप पोलिसांना शोध लागला नाही. पत्नीचा खून केल्यानंतर तो मोपेडवर बसून पळून गेला होता. तो अथवा त्याची मोपेड मुकुंदवाडी पोलिसांना मिळाली नाही. हायवाचालक तरुणाचा खून केल्यानंतर पसार झालेला नील पाटील आणि त्याचे साथीदारही पोलिसांना नऊ दिवसांपासून चकमा देत आहेत, या आरोपींचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. 

Web Title: Detention of house burglary in Aurangabad; The murderer also not found

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.