बळीराजाच्या मुलाचा निर्धार; शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर ३६ जिल्ह्यांतून काढली सायकल फेरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2021 04:04 PM2021-11-24T16:04:11+5:302021-11-24T16:07:36+5:30
शेतकऱ्यांना सन्मानाने जीवन जगता यावे, यासाठी आपला हा छोटासा प्रयत्न असल्याचे त्यांनी नमूद केले.
औरंगाबाद : शेतकऱ्यांना त्यांनी पिकवलेल्या मालाची किंमत ठरवू द्या, शासनाने शेतकऱ्यांना उत्पादन खर्चावर आधारित मदत द्या, शेतकरी कर्जमुक्त करा, यासह विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी बाळासाहेब बाबूराव कोळसे (रा. आडगाव, ता. पाथर्डी, जि. अहमदनगर) हा युवा शेतकरी ३६ जिल्ह्यांतील जिल्हाधिकारी आणि लोकप्रतिनिधींना निवेदन देण्यासाठी सायकलने प्रवास करीत मंगळवारी औरंगाबादेत पोहोचला. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन तो पुढील प्रवासाला रवाना झाला.
शेतकरी कर्ज काढून शेती करतात; मात्र पिकविलेल्या पिकांना बाजारात भाव मिळत नाही. यात तो कर्जबाजारी होऊन खचून जातो आणि आत्महत्येकडे वळतो. या आत्महत्या थांबविण्यासाठी शेतकऱ्यांना त्यांनी पिकवलेल्या मालाचे भाव ठरविण्याचे अधिकार असावेत, राज्य शासनाची सर्व नोकरभरती एमपीएससीमार्फत करावी आदी मागण्यांसाठी बाळासाहेब काेळसे यांनी त्यांच्या गावातून १३ ऑक्टोबरपासून सायकलने प्रवास सुरू केला. आतापर्यंत १७ जिल्हाधिकाऱ्यांना भेटून त्यांनी निवेदने दिली. त्यांनी मंगळवारी औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालय गाठून निवेदन दिले.
शेतकऱ्यांना सन्मानाने जीवन जगता यावे, यासाठी आपला हा छोटासा प्रयत्न असल्याचे त्यांनी नमूद केले. यापुढील प्रवासात आमदार, खासदार आणि अन्य लोकप्रतिनिधींना भेटून निवेदन देणार आहे. शेवटी मुख्यमंत्री आणि राज्यपाल यांना भेटून शेतकऱ्यांच्या मागण्या सोडविण्यासाठी आग्रह धरणार असल्याचे त्यांनी सांगितले.