देवगिरी महाविद्यालय पुढच्या शैक्षणिक वर्षांपासून स्वायत्त,विद्यापीठ कार्यक्षेत्रातील पहिले कॉलेज

By योगेश पायघन | Published: October 31, 2022 06:25 PM2022-10-31T18:25:06+5:302022-10-31T18:25:32+5:30

चौथ्या फेरीत ‘नॅक’ची ए प्लस प्लस श्रेणी घेणारे राज्यातील पहिले, देशात पाचवे स्थान

Devagiri College is the first college under the autonomous in Dr. BAMU jurisdiction from next academic year | देवगिरी महाविद्यालय पुढच्या शैक्षणिक वर्षांपासून स्वायत्त,विद्यापीठ कार्यक्षेत्रातील पहिले कॉलेज

देवगिरी महाविद्यालय पुढच्या शैक्षणिक वर्षांपासून स्वायत्त,विद्यापीठ कार्यक्षेत्रातील पहिले कॉलेज

googlenewsNext

औरंगाबाद : देवगिरी महाविद्यालयास ‘नॅक’कडून ए प्लस प्लस ग्रेड मिळाला आहे. चौथ्यांदा झालेल्या या मूल्यांकनात ४ पैकी ३.५९ गुण घेणारे राज्यातील पहिले, तर देशातील पाचवे स्थान महाविद्यालयाने पटकावल्याचा दावा मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे सरचिटणीस आ. सतीश चव्हाण यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत केला. तसेच महाविद्यालय शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मध्ये डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाशी संलग्न राहून स्वायत्त राहील, असेही त्यांनी जाहीर केले.

‘नॅक’तर्फे तीन सदस्सीय तज्ज्ञ समितीने १८, १९ ऑक्टोबरला भेट देऊन केलेल्या मूल्यांकनानंतर ‘नॅक’चे गुणांकन जाहीर केले. चौथ्या फेरीत देवगिरी महाविद्यालयाने ए प्लस प्लस हा दर्जा मिळविला. मशिप्र मंडळाची २३ महाविद्यालये असून सगळ्या महाविद्यालयांनी ‘नॅक’ची तिसरी फेरी पूर्ण केली असून संस्थेच्या ५ महाविद्यालयांना नॅकची ए श्रेणी आहे. देवगिरी महाविद्यालयास हे मूल्यांकन पुढील सात वर्षांसाठी आहे. नॅकच्या सदस्यांनी आर्टिफिशियल इंटलिजेन्स, डाटा मॅनेजमेंट, जीएसटी कोर्स असे अभ्यासक्रम सुरू करण्याबाबत सल्ला दिल्याचे ते म्हणाले. पत्रकार परिषदेस मशिप्र मंडळाचे उपाध्यक्ष शेख सलीम, सदस्य मोहन सावंत, पंडितराव हर्षे, नीलिमा सावंत, प्राचार्य डॉ. अशोक तेजनकर, उपप्राचार्य डॉ. दिलीप खैरनार, डॉ. अनिल आर्दड, डॉ. विष्णू पाटील यांची उपस्थिती होती.

मशिप्रचा अभिमत विद्यापीठाचा विचार नाही..
स्वायत्ततेनंतर महाविद्यालयाची प्रवेश प्रक्रिया, परीक्षा घेणे, पदवी प्रदान करणे हे सर्वच महाविद्यालयातर्फे करण्यात येणार असून महाविद्यालयातर्फे पीएच.डी. विभागही सुरु होईल. महाविद्यालय स्वायत्त झाल्यानंतर अनुदानित विषयांच्या विद्यार्थी शुल्कात फरक पडणार नाही. मात्र, ज्या विषयांना अनुदान नाही, त्यांचे शुल्क महाविद्यालय ठरवेल. तसेच संस्थेचा अभिमत विद्यापीठाचा विचार नसल्याचे चव्हाण म्हणाले.

प्राध्यापक भरतीचे धोरण बदलावे...
महाविद्यालयातील ४० टक्के म्हणजे ८० जागा रिक्त आहेत. त्यामुळे गुणांकन घसरले. राज्यभरात प्राध्यापक भरतीची प्रक्रिया रेंगाळल्याने अशी स्थिती आहे. तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांच्या मानधनाचा निर्णय झाला, पण शासनादेश निघाला नाही. देवगिरी महाविद्यालयातील ३६ पैकी ६ विषय, कोर्स अनुदानित आहेत. अनुदानित प्राध्यापक असलेल्या पारंपरिक अभ्यासक्रमांना रोजगार मिळत नाही. १०० टक्के रोजगार देणाऱ्या कोर्सला तुटपुंज्या मानधनावरील प्राध्यापकांऐवजी अनुदानित प्राध्यापक मिळावेत, अशी मागणी चव्हाण यांनी केली.

विद्यापीठ कार्यक्षेत्रातील पहिले काॅलेज...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ कार्यक्षेत्रात ‘ नॅक ए ग्रेड’ मिळवणारे देवगिरी महाविद्यालय पहिले आहे. या महाविद्यालयाप्रमाणेच अन्य महाविद्यालयांनी नॅकचा उत्तम दर्जा मिळून स्वायत्तता घ्यावी. काॅलेज क्लस्टरची स्थापना करावी.
-डॉ. प्रमोद येवले, कुलगुरू, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद.

Web Title: Devagiri College is the first college under the autonomous in Dr. BAMU jurisdiction from next academic year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.