मुंबई, पुण्याच्या धर्तीवर औरंगाबादसाठी विकास प्राधिकरण; मुख्यमंत्र्यांनी केली घोषणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2020 03:31 PM2020-09-17T15:31:03+5:302020-09-17T15:36:57+5:30
मराठवाड्याच्या सर्वांगिण विकासासाठी शासन कटिबध्द
औरंगाबाद: मुंबई, पुण्याच्या धर्तीवर औरंगाबादसाठी विकास प्राधिकरण स्थापन करावे, अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी केली. येणाऱ्या काळात विभागासाठी महत्वाच्या योजना मार्गी लावल्या जातील, तसेच यंदा जरी पाऊस चांगला झाला असला तरी आगामी काळात दुष्काळ पडणार नाही याची काळजी सरकार घेत उपाय योजना करील, असेही मुख्यमंत्री म्हणाले. साडेबारा मिनिटे ते बोलले, यात त्यांनी मुक्ती संग्रामदिन, वीरांचे बलिदान यावर प्रकाश टाकला.
पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते मनपाच्या सिद्धार्थ उद्यानातील स्मृतीस्तंभाला पुष्प चक्र अर्पण करण्यात आले, त्यानंतर ध्वजरोहण झाले. यानंतर मुख्यमंत्री ठाकरे यांनी मुक्ती संग्राम दिनानिमित्त मुबईतून ऑनलाईन शुभेच्छा संदेश दिला. मराठवाडा जिद्दी, चिवट, हिम्मतवंतांचा आहे. मराठवाडा विकासाच्या दिशेने चालला आहे. यंदा समाधानकारक पाऊस झाला असला तरी शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून मराठवाडा दुष्काळमुक्त करण्याची जबाबदारी आपल्या सरकारने निश्चितपणे घेतली आहे. मुंबई ते नागपूर या शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे समृध्दी महामार्गाच्या माध्यमातून मराठवाडा समृध्द होणार आहे. मुंबई, पुण्याला ज्याप्रमाणे विकास प्राधिकरण आहे त्या पध्दतीने औरंगाबाद विकास प्राधिकरण करण्याचा निश्चित प्रयत्न केला जाईल अशी ग्वाही यावेळी मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिली.
ध्वजारोहण कार्यक्रमाप्रसंगी रोजगार हमी, फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे, महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार, आमदार अंबादास दानवे, आमदार हरिभाऊ बागडे, आमदार संजय शिरसाट, आमदार प्रदीप जैस्वाल, आमदार उदयसिंग राजपूत, आमदार अतुल सावे, विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, महानगर पालिका प्रशासक अस्तिक कुमार पाण्डेय, पोलीस आयुक्त डॉ.निखील गुप्ता, पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील, ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक आदींची उपस्थिती होती.
माझे कुटुंब, माझी जबाबदारी, या मोहिमेत सहभागी व्हा
मराठवाडा ही संतांची भूमी आहे. अनेक स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानातून व त्यांनी सहन केलेल्या अत्याचारातून ही भूमी रझाकारांच्या जोखडातून मुक्त झाली आहे. मराठवाड्यासाठी आजचा दिवस स्वातंत्र्यदिन आहे. या आंदोलनामध्ये जसा मराठवाडा सहभागी झाला होता तसेच आता आपण कोरोना विषाणू उच्चाटनासाठी "माझे कुटुंब, माझी जबाबदारी" या मोहिमेत येथील जनतेने सहभागी व्हावे, असे आवाहन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केले.