शहरात विकासकामांचा खोळंबा; महापालिकेची प्रत्येक काम अर्धवट सोडून देण्याची प्रवृत्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2019 01:09 PM2019-11-25T13:09:14+5:302019-11-25T13:10:50+5:30
गाजावाजा करून एखाद्या कामाचा श्रीगणेशा करायचा आणि नंतर ते काम अर्धवट सोडून देण्याची प्रवृत्ती अलीकडे मनपात वाढली आहे.
- मुजीब देवणीकर
औरंगाबाद : महापालिका दिवाळखोरीत निघाली आहे, ही वस्तुस्थिती आहे. तिजोरीत निधी नसल्याने विकासकामांचा खोळंबा झाला आहे. ज्या कामांसाठी शासन निधी प्राप्त आहे, ती कामेही मनपाकडून वर्षानुवर्षे होत नाहीत. गाजावाजा करून एखाद्या कामाचा श्रीगणेशा करायचा आणि नंतर ते काम अर्धवट सोडून देण्याची प्रवृत्ती अलीकडे मनपात वाढली आहे. सत्ताधारीही पन्नास विकासकामांची यादी घेऊन बसतात, त्यामुळे एकही काम पूर्ण होत नाही.
वल्लभभाई पटेल यांचा पुतळा
शहागंज चमन येथे सरदार वल्लभभाई पटेल यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याच्या कामाचा शुभारंभ मागील वर्षी करण्यात आला. दोन महिन्यांत चबुतरा आणि सुशोभीकरणाचे काम पूर्ण करून १ जानेवारी २०१९ रोजी पुतळ्याचे लोकार्पण होेणार असल्याची घोषणा केली होती. १ जानेवारी २०२० उजाडण्यास अवघे ३७ दिवस शिल्लक आहेत. अद्याप पुतळ्याचे लोकार्पण, सुशोभीकरण मनपाला करता आले नाही. पटेल यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यासाठी २०१० मध्ये तत्कालीन नगरसेवक जगदीश सिद्ध यांनी ठराव ठेवून मनपाकडून २० लाख रुपयांचा निधी मंजूर करून घेतला होता. यासाठी तत्कालीन खा. चंद्रकांत खैरे यांनीही ४० लाख रुपयांचा निधी दिला आहे.
लक्ष्मण चावडी ते एमजीएम रस्ता
जालना रोडला पर्यायी रस्ता व्हावा, अशी ओरड दहा वर्षांपासून सुरू आहे. महापालिकेने मोठी आर्थिक जुळवाजुळव करून लक्ष्मण चावडी ते एमजीएम रस्त्याचे काम मे २०१८ मध्ये सुरू केले. दीड वर्षामध्ये मनपाला हे काम पूर्ण करता आले नाही. तब्बल १४ कोटी रुपये या रस्त्याच्या कामावर खर्च करण्यात येणार आहेत. हा निधी मनपाच्या तिजोरीत पडून असतानाही प्रशासनाला काम पूर्ण करून घेण्यासाठी वेळ नाही.
टी.व्ही. सेंटर शॉपिंग कॉम्प्लेक्स
टी.व्ही. सेंटर येथील व्यापारी संकुलाचे काम दोन वर्षांपूर्वी मनपाने पूर्ण केले. येथील ५० गाळे लिलाव पद्धतीने विकण्यात आले. महापालिकेच्या तिजोरीत तब्बल १२ कोटींचा निधी जमा झाला. ४६ गाळ्यांचे बांधकाम पूर्ण केले. त्यासाठी ३ कोटी ७७ लाख ४४ हजार रुपये खर्च करण्यात आले. आजपर्यंत गाळेधारकांना महापालिकेने ताबा दिलेला नाही. लिलावात ज्या व्यापाऱ्यांनी दुकाने घेतली त्यांच्याकडून उर्वरित निधीही मनपाने जमा करून घेतला नाही. सध्या शॉपिंग कॉम्प्लेक्स शोभेची वास्तू बनली आहे.
महिला नगरसेविकांचा कार्यकाळ संपत आला...
शहरात वेगवेगळ्या भागात दहा महिला शौचालय उभारण्यासाठी विद्यमान महिला नगरसेविकांनी चंगच बांधला होता. पाच वर्षांचा कार्यकाळ संपत आला तरी महापालिका प्रशासनाला औरंगपुरा वगळता एकाही ठिकाणी महिला शौचालय बांधता आले नाही. ३१ आॅक्टोबर २०१८ ची डेडलाईन महिला नगरसेविकांनी प्रशासनाला दिली होती. ३१ आॅक्टोबर २०१९ संपले तरी काम झाले नाही, हे विशेष.