छत्रपती संभाजीनगरात ६ कोटी खर्च करून ७ उद्यानांचा विकास, वेगवेगळ्या भागात उद्याने होणार
By मुजीब देवणीकर | Published: June 27, 2024 07:50 PM2024-06-27T19:50:55+5:302024-06-27T19:51:19+5:30
केंद्र सरकारच्या भांडवली अनुदानातून मनपाला प्राप्त झालेल्या ६ कोटी रुपयांच्या निधीतून ७ उद्याने विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
छत्रपती संभाजीनगर : सिद्धार्थ उद्यान सोडले तर शहरात एकही चांगले उद्यान नाही. आता टीव्ही सेंटर रोडवरील स्वामी विवेकानंद, सिडको एन-७ येथील उद्याने नागरिकांच्या पसंतीस उतरत आहेत. शहराच्या वेगवेगळ्या भागात दर्जेदार उद्याने असावीत, अशी संकल्पना प्रशासक जी. श्रीकांत यांनी मांडली. त्यानुसार नियोजन करण्यात आले. एमजीएम परिसरातील बाळासाहेब ठाकरे स्मारक, सातारा परिसरात तीन, उल्कानगरी, कॅनॉट गार्डन, गारखेडा भागातील उद्याने विकसित केली जाणार आहेत. उद्यान उभारणीत पश्चिम विधानसभेला झुकते माप देण्यात आले, हे विशेष.
शहराची लोकसंख्या १८ लाख गृहित धरली तर मोठी व चांगली उद्याने नाहीत. ज्याठिकाणी उद्याने आहेत, तिथे विकास नाही. भकास अवस्थेमुळे नागरिक पाय ठेवत नाहीत. लहान मुले, ज्येष्ठ नागरिकांना विरंगुळ्यासाठी चांगली उद्याने असावीत, असे प्रशासक जी. श्रीकांत यांनी मागीलवर्षीच नमूद केले होते. लहान मुलांना मोबाइलपासून दूर ठेवत मैदानावर आणले पाहिजे, अशी संकल्पनाही मांडली. मागील काही दिवसांमध्ये सिद्धार्थ उद्यानात संगीत कारंजे, इलेक्ट्रिक ट्रेन, एन-७ येथे नौका विहार, स्वामी विवेकानंद उद्यानात बुलेट ट्रेन सुरू करण्यात आली. नागरिकांकडून याठिकाणी चांगला प्रतिसादही मिळू लागला. केंद्र सरकारच्या भांडवली अनुदानातून मनपाला प्राप्त झालेल्या ६ कोटी रुपयांच्या निधीतून ७ उद्याने विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मनपाकडून ७ जागाही निश्चित
सातारा परिसरातील गट नंबर १६८ मधील दीड एकर जागा, गट नंबर ९२/९३ मधील जागा, गट नंबर १४४ मधील जागेवर उद्याने विकसित होणार आहेत. याठिकाणी सिंथेटिक ट्रॅक, मैदान, ओपन जीम, पाण्याची व्यवस्था, बसण्यासाठी बाके आदी सुविधा राहतील. एमजीएम परिसरातील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मारकातील तळ्याचे सुशोभिकरण, सिडको एन-१ मधील कॅनॉट गार्डन, उल्कानगरी भागातील आदित्य नगर उद्यान, गारखेडा भागातील सर्व्हे नंबर ५३ मधील उद्यानांचा समावेश आहे.
चार हरितक्षेत्र विकास
केंद्र सरकारच्या १५ व्या वित्त आयोगाकडून प्राप्त झालेल्या निधीतून महापालिकेने चार ठिकाणी हरितक्षेत्र विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे. इटखेडा भागातील गोल्डन सिटी, भावसिंगपुऱ्यातील पेठे नगर, साकेत नगर, सिडको एन-२ मधील कामगार चौक येथील मनपाच्या मोकळ्या जागांवर हरितक्षेत्राचा विकास केला जाणार आहे.