सोयगावचा विकास महिलांच्या हाती; नगराध्यक्ष, उपनगराध्यक्षपदी शिवसेनेचे उमेदवार बिनविरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2022 01:35 PM2022-02-08T13:35:32+5:302022-02-08T13:36:53+5:30
सोयगाव नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी शिवसेनेच्या आशाबी तडवी,उपनगराध्यक्षपदी सुरेखा काळे यांनी बिनविरोध निवड झाली
सोयगाव ( औरंगाबाद ) : सोयगाव नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष, उप नगराध्यक्षपदाची निवडणूक आज बिनविरोध पिठासन अधिकारी संजीव मोरे यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी सभा पार पडली. यावेळी नगराध्यक्ष पदासाठी शिवसेनेच्या आशाबी तडवी यांचा तर उपनगराध्यक्ष पदासाठी सुरेखाबाई काळे यांची बिनविरोध निवड झाली.
सोयगाव नगरपंचायत निवडणुकीत राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या नेतृत्वात शिवसेनेने एकहाती बाजी मारल्याने राज्यात ही निवडणूक चर्चेचा विषय ठरली आहे. या निवडणुकीत भाजप, कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसला सपाटून पराभवाचा दणका बसला. यानंतर नगराध्यक्ष आणि उपनाराध्यक्षपदासाठी कोणाची निवड होणार याची उत्सुकता होती. आरक्षणात नगराध्यक्ष पद अनुसूचित जाती- महिला प्रवर्गास राखीव निघाले. विशेष म्हणजे, शिवसेना आणि भाजप दोन्ही पक्षांकडे या प्रवर्गातील उमेदवार निवडून आला होता. यामुळे आज होणाऱ्या निवडणुकीत काय होईल याची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. सकाळी शिवसेनेकडून नगराध्यक्ष पदासाठी शिवसेनेच्या आशाबी तडवी तर उपनगराध्यक्ष पदासाठी शिवसेनेच्याच सुरेखाबाई काळे यांनी अर्ज दाखल केले. विहित वेळेत नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष पदासाठी अन्य एकही अर्ज प्राप्त न झाल्याने नगराध्यक्ष पदी आशाबी तडवी आणि उपनगराध्यक्ष सुरेखाबाई काळे यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा पिठासन अधिकारी संजीव मोरे यांनी केली. दरम्यान, यावेळी भाजपचे दोन्ही सदस्य सभागृहात गैरहजर होते.
शहराचा विकास महिलांच्या हाती
नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष पदी शिवसेनेच्या दोन्ही महिलाच विराजमान झाल्या आहेत. तसेच सभागृहात आठ महिला नगरसेविका आहेत. यामुळे शहराचा विकास महिलांच्या हाती आहे. निवड प्रक्रियेचे कामकाज तहसीलदार रमेश जसवंत, मुख्याधिकारी राहुल सूर्यवंशी आदींनी पाहिले.