लोकसहभागातून विकास
By Admin | Published: February 19, 2016 12:16 AM2016-02-19T00:16:51+5:302016-02-19T00:38:34+5:30
टीम लोकमत , अंभोरा चोहोबाजूंनी डोंगर... वृक्षवेली... थूई- थूई नाचणारे मोर... व पक्ष्यांचा सुरेल किलबिलाट... निसर्गाची अशी मुक्त उधळण झालेल्या अंभोरा (ता. आष्टी) या गावाने
टीम लोकमत , अंभोरा
चोहोबाजूंनी डोंगर... वृक्षवेली... थूई- थूई नाचणारे मोर... व पक्ष्यांचा सुरेल किलबिलाट... निसर्गाची अशी मुक्त उधळण झालेल्या अंभोरा (ता. आष्टी) या गावाने लोकसहभागातून विकासाचा मार्ग स्वीकारला आहे. चारशे उंबरठे व २२०० लोकसंख्येच्या या गावातील बहुतांश कामे लोकवर्गणीतून साकारली आहेत. विकासाला लोकसहभागाची जोड देत गावाने तालुक्यात छाप सोडली आहे.
अहमदनगर जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या या गावात पोलीस ठाणे, टेलीफोन कार्यालय, हायस्कूल विकासाची साक्ष देतात. गावातील गुळगुळीत रस्ता गाव विकासाच्या ‘मार्गा’वर असल्याचे सांगून जातो. ठाणे आहे;पण गावातील वाद कधी ठाण्यापर्यंत जात नाहीत हे वैशिष्ट्य! विविध जाती- धर्मांचे लोक येथे गुण्यागोविंदाने राहतात.
रस्ते, पाणी, दिवे या मूलभूत सुविधांची वाणवा नाही. मात्र, गावाभोवताली डोंगर परिसर असल्याने पाणलोटची कामे व्हावीत, अशी ग्रामस्थांची अपेक्षा. ज्वारी, बाजरी, कांदा व फळबागा ही शिवारातील प्रमुख पिके! जलयुक्त शिवार योजनेत गावचा समावेश केल्यास कृषीउत्पन्नात वाढ होईल, असा गावकऱ्यांना विश्वास वाटतो.
श्री. अंबेश्वर महादेवाचे यादवकालीन मंदिर गावचा एैतिहासिक वारसा जपणारे आहे. भाविकांच्या हाकेला घावून येणारे देवस्थान म्हणून या मंदिराची परिसरात ख्याती आहे. चैत्र महिन्यात येथे मोठी यात्रा भरते. यावेळी विविध धार्मिक कार्यक्रम उत्साहात पार पडतात.
मंदिर विकास लोकसहभागातून
श्री अंबेश्वर मंदिराच्या विकासासाठी गावकऱ्यांनी कोणापुढे हात पसरले नाहीत. अख्खे गाव एकत्रित आले अन् कुवतीप्रमाणे निधी उभा केला. यातून जीर्णोद्धार, संरक्षक भिंत, सुशोभिकरण, रंगरंगोटी आदी कामे पूर्ण करण्यात आली.
अपुरी पोलीस निवासस्थाने
अंभोरा ठाण्यात ४० कर्मचारी आहेत. ठाण्यांतर्गत ८५ गावांचा भार आहे. केवळ चार ते पाच कर्मचारी राहू शकतील एवढी निवासस्थाने आहेत. इतर कर्मचाऱ्यांना भाड्याने घर घेऊन राहावे लागते. काहीजण आष्टी, अहमदनगर व शेजारच्या गावात राहून ये-जा करतात.