नवनिर्मितीला चालना दिल्यास विकास शक्य
By Admin | Published: July 16, 2017 12:23 AM2017-07-16T00:23:49+5:302017-07-16T00:35:21+5:30
औरंगाबाद :नवनिर्मितीला चालना देऊनच आर्थिक सुबत्ता साध्य केली जाऊ शकते, असे प्रतिपादन पद्मविभूषण,ज्येष्ठ वैज्ञानिक प्रा. एम. एम. शर्मा यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : इनोव्हेशन किंवा नवनिर्मिती करण्याची सर्व क्षमता असूनही आपल्या देशातील लोकांची सृजनशीलता सिलिकॉन व्हॅलीमध्ये गेल्यावरच का फळास येते? याचे कारण सोपे आहे. आपल्याकडे नवनिर्मिती करण्यासाठी पोषक वातावरण नाही. नवनिर्मितीला चालना देऊनच आर्थिक सुबत्ता साध्य केली जाऊ शकते, असे प्रतिपादन पद्मविभूषण,ज्येष्ठ वैज्ञानिक प्रा. एम. एम. शर्मा यांनी केले.
‘सीएमआयए’तर्फे शनिवारी (दि.१५) तापडिया नाट्यमंदिरात आयोजित यशवंत व्याख्यानमालेत ते बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून इन्स्टिट्यूट आॅफ केमिकल टेक्नॉलॉजीचे कुलगुरू प्रा. जी. डी. यादव होते.
‘इनोव्हेशन्स फॉर रॅपिड इकोनॉमिक ग्रोथ’ या विषयावर बोलताना प्रा. शर्मा म्हणाले, ‘जगाच्या अर्ध्या आर्थिक विकासासाठी तंत्रज्ञानाची प्रगती कारणीभूत आहे. त्यामुळे तंत्रज्ञान विकासासाठी अधिक तरतूद करण्याकडे धोरण ठरविणाऱ्यांनी लक्ष द्यावे. श्रीमंत देशांमध्येच विज्ञान-तंत्रज्ञानामध्ये गुंतवणूक केली जात नाही, तर विज्ञान-तंत्रज्ञानामध्ये गुंतवणूक करणारे देशच श्रीमंत होत असतात, हे एम. बार्बासिड यांचे वाक्य अगदी खरे आहे. भारतात मोठ्या प्रमाणात संशोधन का होत नाही याचे विश्लेषण करताना ते म्हणाले की, नवनवीन कल्पनांना संशोधनाची जोड देऊन पारंपरिक चौकटी मोडणारे काही तरी निर्माण करण्याची प्रेरणा आपल्याकडे फारशी दिसत नाही. ‘अपयशाची भीती’ म्हणजे नवनिर्मितीच्या मार्गातील सर्वात मोठा अडथळा. मोठ्या मनाने अपयश स्वीकारून त्यातून यशाचा मार्ग शोधला तरच क्रांतिकारक शोध लागतात. दुर्दैवाने तसे वातावरण आपल्याकडे नाही.
प्रा. यादव म्हणाले, ‘मानवी प्रतिभेला मर्यादा नसतात. स्वत:ला कमी लेखण्याची चूक करू नका. तुमच्यामध्ये जर कौशल्य असेल तर तुम्हाला कोणीच रोखू शकणार नाही.’ देशाचे भविष्य संशोधकांवर अवलंबून असते, असे सांगताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू बी. ए. चोपडे म्हणाले की, नावीन्यता आणि कल्पकतेच्या जोरावर अधिकाधिक विद्यार्थ्यांनी संशोधनाची वाट निवडावी. तत्पूर्वी बी. ए. चोपडे यांच्या हस्ते प्रा. शर्मा व प्रा. यादव यांना स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. यावेळी मंचावर मुकुंद भोगले, प्रसाद कोकिळ, नरेंद्र वैद्य आणि जयंत सांगवीकर होते. रितेश शर्मा यांनी सूत्रसंचालन केले. राजकीय आणि नोकरशाही व्यवस्थेत नवीन संकल्पना जन्म घेणे किती अवघड आहे, याचे उदाहरण देताना प्रा. शर्मा म्हणाले की, दिल्लीमध्ये मी जीव तोडून वैज्ञानिक गोष्टींचा पाठपुरावा करायचो. मात्र, ते अधिकाऱ्यांना पटायचे नाही. यावर एका अधिकाऱ्याने मला सांगितले होते की, एवढा त्रास कशाला करून घेता. दिल्लीमध्ये लॉजिक (तर्क) चालत नाही. उगीच शक्ती घालवण्यात काही अर्थ नाही.