व्हॉटस् अ‍ॅप ग्रुपच्या माध्यमातून साधला गावचा विकास 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2018 07:42 PM2018-11-14T19:42:19+5:302018-11-14T19:50:21+5:30

सिल्लोड तालुक्यातील केऱ्हाळा येथील ‘आम्ही केऱ्हाळेकर’ या व्हॉटस् ग्रुपने गावाचा सर्वांगीण विकास साधला आहे.

Development of village through Whatsapp App Group | व्हॉटस् अ‍ॅप ग्रुपच्या माध्यमातून साधला गावचा विकास 

व्हॉटस् अ‍ॅप ग्रुपच्या माध्यमातून साधला गावचा विकास 

googlenewsNext

- कैलास पांढरे 

औरंगाबाद : सिल्लोड तालुक्यातील केऱ्हाळा येथील ‘आम्ही केऱ्हाळेकर’ या व्हॉटस् ग्रुपने गावाचा सर्वांगीण विकास साधला आहे. या ग्रुपमुळे गावातील खड्डेमय रस्ते, व त्यावर वाहणारे नालीचे पाणी आदी कामांचे योग्य नियोजन करुन गावातील नागरिकांची मने जिंकली. यानंतर सर्वांनी सहभाग नोंदवून गावात विकास गंगा आणण्याचे काम सुरु केले आहे. सध्या याच विषयाची चर्चा तालुक्यात सुरु आहे.  

केऱ्हाळा गावचे रहिवासी असलेल्यांनी हा ग्रुप तयार केला असून त्याद्वारे गावातील हालचालींचा आढावा घेतला जातो. मनोरंजन म्हणून या ग्रुपचा वापर न करता गावात काय नवीन करता येईल, यावर चर्चा केली जाते. या ग्रुपमध्ये गावातील २१५ सदस्यांचा समावेश आहे. यात आजी-माजी सैनिक, पत्रकार, पुढारी, शिक्षक, व्यापारी, प्रगतशील शेतकरी, शेतमजूर, डॉक्टर यासारखे अनेक मान्यवर आहेत. या ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी अजून अनेक जण ‘प्रतिक्षेत’ आहेत.  

गावात चार वर्षांपासून रस्त्याचे काम रेंगाळले होते. यासाठी कुणी लक्ष देत नसल्याने या ग्रुपमधील सदस्यांनी एकत्र येऊन मदतीचा हात पुढे केला. त्यामुळे चार वर्षांपासून रेंगाळलेल्या या रस्त्याचे काम काही मिनिटातच नियोजन करुन सुरु केले व लगेच पूर्णही करुन टाकले. ग्रुपच्या माध्यमातून चांगले काम झाल्याने गावातील नागरिकांनी या सदस्यांचे आभार मानले.

या रस्त्याचे उद्घाटन केऱ्हाळा येथील ह.भ.प. सुधाकर महाराज पांढरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सूर्यभान बन्सोड, संजय राजपूत, विलास शेळके व आजिनाथ भिंगारे, राहुल सुरडकर, सदस्य सागर पाटील, दत्ता पांढरे, राजीव पांढरे, दत्ता लोखंडे, रमेश गंगावणे, राजू लोखंडे, गजानन कुमावत, मधुकर परचुरे, राजू बोराडे, कृष्णा पांढरे, प्रवीण सुरडकर, सुदाम बन्सोड, कैलास शेळके, भरत दारुंटे, शिवाजी बांबर्डे, राजू कळम, भाऊसाहेब मैंद, आजिनाथ परचुरे, सखाराम मिसाळ, शिवाजी पवार, राम जोशी, श्याम जोशी, दिगंबर बोराडे, अवचित शेंडे, महिला व ग्रामस्थ उपस्थित होते.

‘स्मार्ट व्हिलेज’चा मानस
सोशल मिडियाचा मनोरंजन, गप्पाटप्पासाठी वापर न करता सकारात्मक, विकासात्मक कामासाठी उपयोग झाला पाहिजे, विज्ञानाच्या या वरदानाचा आम्ही गावाच्या हितासाठी वापर करत आहोत, असे या ग्रुपने आवाहन केले आहे. भविष्यात याच ग्रुपच्या माध्यमातून ‘स्मार्ट व्हिलेज’कडे वाटचाल करण्याचा या सदस्यांचा मानस आहे. 

Web Title: Development of village through Whatsapp App Group

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.