कोरोनानंतर प्रशासन निवडणुकीत; औरंगाबाद जिल्ह्यातील विकासकामांना आचारसंहितेमुळे लागला ब्रेक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2020 03:30 PM2020-12-16T15:30:01+5:302020-12-16T15:32:33+5:30
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विकासकामांना लागणारा निधी गोठवून तो कोरोनाच्या उपाययोजनांसाठी वळविण्यात आलेला आहे.
औरंगाबाद : जिल्ह्यातील विकासकामांना आचारसंहितेमुळे ब्रेक लागला आहे. नोव्हेंबर आणि डिसेंबर महिना पदवीधर निवडणुकीच्या आचारसंहितेत गेला. १५ डिसेंबरपासून ग्रामपंचायत निवडणुकीचा धुराळा उडणार असल्यामुळे १८ जानेवारीपर्यंत आचारसंहिता राहणार आहे. कोरोनातून सावरत नाहीत तोवर यंत्रणा निवडणुकीच्या कामाला लागली आहे. परिणामी जिल्ह्यातील विकासकामांना ब्रेक लागला आहे.
लोकप्रतिनिधींच्यानिधीतील कामांना सध्या ब्रेक असणार आहे. तसेच जी कामे मंजूर झाली आहेत, त्यांचेही उद्घाटन आचारसंहितेच्या काळात होणार नाही. जिल्हा नियोजन विभागाकडे प्रस्तावित कामे सध्या सुरू होणार नाहीत. त्यांची प्रक्रिया पूर्ण होईल. तसेच जिल्हा परिषद पातळीवर असलेली नवीन कामे देखील सुरू होणार नाहीत. पंचायत समित्यांच्या अंतर्गत येणाऱ्या कामांना आचारसंहितेमुळे ब्रेक लागला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विकासकामांना लागणारा निधी गोठवून तो कोरोनाच्या उपाययोजनांसाठी वळविण्यात आलेला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील रस्त्यांसह पाणीपुरवठा योजनेची व नावीन्यपूर्ण योजनांची कामे ठप्प पडली आहेत. लॉकडाऊनमध्ये हळूहळू सवलत दिल्यानंतर जी कामे मंजूर होती, ती पुन्हा सुरू झाली. ज्या कामांची गरज होती, त्यांचे अंदाजपत्रक तयार झाले, मात्र पदवीधर निवडणुकीमुळे ती कामे थांबली होती. आता ग्रामपंचायत निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे विकासकामांना १८ जानेवारीपर्यंत मुहूर्त लागणार नाही.
जिल्हाधिकाऱ्यांची माहिती अशी...
जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी सांगितले, पदवीधरच्या निवडणुकीत एक महिना गेला. त्यानंतर आता ग्रामपंचायत निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे नवीन विकासकामांना ब्रेक लागणार आहे. नवीन कामे होणार नाहीत; परंतु जी कामे सुरू झालेली आहेत. ती कामे सुरुच राहतील.