२ कोटी ६६ लाखांची विकास कामे बदलली
By Admin | Published: March 17, 2016 11:58 PM2016-03-17T23:58:10+5:302016-03-18T00:08:29+5:30
परभणी : जिल्हा नियोजन समितीच्या वतीने देण्यात येणाऱ्या निधीतून जिल्हा परिषदेने यापूर्वी प्रस्तावित केलेल्या २ कोटी ६६ लाख रुपयांच्या कामांमध्ये बदल केला
परभणी : जिल्हा नियोजन समितीच्या वतीने देण्यात येणाऱ्या निधीतून जिल्हा परिषदेने यापूर्वी प्रस्तावित केलेल्या २ कोटी ६६ लाख रुपयांच्या कामांमध्ये बदल केला असून बदलेली ही कामे वेळेत पूर्ण होतील की नाही, या विषयी मात्र अनिश्तिता आहे.
जिल्हा नियोजन समितीच्या वतीने जिल्हा परिषदेला विविध योजनांसाठी निधी उपलब्ध करुन दिला जातो. जनसुविधा योजनेअंतर्गत जिल्हा परिषदेला २०१५-१६ या आर्थिक वर्षाकरीता ३ कोटी ५० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. त्यानंतर जि.प.तील सदस्यांनी अनेक कामे सूचविली होती. त्यातील १८ कामे बदलण्यात आली आहेत. त्यामध्ये झरी येथे ३ लाख रुपये खर्चून करण्यात येणारे स्मशानभूमीचे काम आता पिंपळा येथे होणार आहे. झरी येथीलच स्मशानभूमी रस्त्याचे ३ लाखांचे काम बदलून ते पिंपळा येथेच स्मशानभूमीसाठी तारेचे कुंपन बांधण्यासाठी केले जाणार आहे. जिंतूर तालुक्यातील दुधगाव येथील स्मशानभूमी शेडचे ३ लाखांचे काम बदलून आता याच गावात स्मशानभूमी रस्त्याचे काम केले जाणार आहे. गंगाखेड तालुक्यातील डोंगरजवळा येथील स्मशानभूमी रस्त्याचे ३ लाखांचे काम बदलून ते आता बडवणी येथे केले जाणार आहे. पालम तालुक्यातील पोखर्णी देवी येथील स्मशानभूमी रस्त्याचे ८ लाखांचे काम आता परभणी तालुक्यातील ब्रह्मपुरी तर्फे लोहगाव येथे केले जाणार आहे. पूर्णा तालुक्यातील भाटेगाव येथीेल ४ लाख ५० हजार रुपयांचे स्मशानभूमी रस्त्याचे काम आता सोन्ना येथे केले जाणार आहे. मानवत तालुक्यातील इरळद येथील स्मशानभूमी शेडचे ३ लाखांचे काम बदलून आता येथेच रस्त्याचे काम केले जाणार आहे. परभणी तालुक्यातील ठोळा येथील स्मशानभूमी शेडचे ४ लाखांचे काम बदलून येथेच शेड व रस्ता या दोन टप्प्यात केले जाणार आहे. गंगाखेड तालुक्यातील मरगळवाडी येथील स्मशानभूमी शेड व रस्त्याचे ८ लाखांचे काम बदलून ते कासारवाडी येथे केले जाणार आहे. सेलू तालुक्यातील शिंदे टाकळी येथील स्मशानभूमी शेडचे काम बदलून ते कुंडी येथे केले जाणार आहे. जिंतूर तालुक्यातील पिंपळगाव गायके येथील स्मशानभूनी रस्त्याचे ३ लाखांचे काम बदलून ते आता कौसडी येथे केले जाणार आहे. जिंतूर तालुक्यातील मोळा येथील स्मशानभूमी शेडचे २ लाख ५० हजार रुपयांच्या शेडचे काम जोगवाडा येथे केले जाणार आहे. सेलू तालुक्यातील सिंगठाणा येथील ३ लाखांचे शेडचे काम बदलून ते पालम तालुक्यातील रामापूर येथे केले जाणार आहे. कुपटा येथील तीन लाखांचे शेडचे काम बदलून ते कान्हड येथे केले जाणार आहे. धसाडी येथील पाच लाखांच्या कामाचे दोन टप्पे पाडण्यात आले आहेत. तसेच जिंतूर तालुक्यातील जांब खु. येथील भक्त निवासाच्या ७ लाखांच्या कामात बदल करुन आता हा निधी पाण्याच्या कामावर खर्च केला जाणार आहे.
तसेच २०१२-१३ या वर्षातील तीर्थक्षेत्र विकास योजनेअंतर्गत सोनपेठ तालुक्यातील वंदन येथे भक्त निवासासाठी ५ लाख रुपये मंजूर झाले होते. हे काम झाले नाही. त्यामुळे आता हा निधी याच तालुक्यातील निमगाव येथे देण्यात येणार आहे. तसेच २०१३-१४ मध्ये जिंतूर तालुक्यातील कुंभारी येथे स्मशानभूमी शेडसाठी दिलेला २ लाखांचा निधी खर्च झाला नसल्याने तो निधी आता गोंधळा येथे रस्ता कामासाठी खर्च केला जाणार आहे. चिकलठाणा बु. ते चिकलठाणा तांडा या रस्त्याच्या मजबुतीकरणासाठी १५ लाख रुपये मंजूर करण्यात आले होते. आता हे काम बदलण्यात आले असून हा निधी आता राज्यमार्ग २२१ ते नागठाणा रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरणासाठी खर्च केला जाणार आहे.
जोडरस्ता काजळी रोहिणी मजबुतीकरण ० ते १ कि.मी.साठी मंजूर झालेला १५ लाख रुपयांचा निधी आता या रस्त्यावर ४ ते ५ कि.मी. मार्गावर खर्च केला जाणार आहे. जोगवाडा- जिंतूर-घेवंडा या ४/९०० ते ६/९०० इजिमा रस्ता मजुबतीकरणाचा ४६ लाख रुपयांचा निधी ६/४०० ते ८/९०० या रस्ता कामावर खर्च केला जाणार आहे. सेलू तालुक्यातील शिंदे टाकळी व लाडनांदरा जि.प.शाळा या शाळांच्या दुरुस्तीसाठी मंजूर करण्यात आलेला प्रत्येकी २ लाख ५० हजार रुपयांचा निधी आता सेलू येथील जि.प. केंद्रीय प्राथमिक शाळेसाठी खर्च केला जाणार आहे.